BMC News : मुंबईत कचऱ्यांच्या संवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्हीची नजर, कचरा फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून मुंबई स्वच्छतेच्या बाबतीत अधिक व्यापक आणि प्रभावी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या संपूर्ण मुंबईत दृश्यमान स्वच्छता वाढवणे, उघड्यावर कचरा टाकण्यास प्रतिबंध घालणे आणि कचऱ्यांच्या संवेदनशील ठिकाणांचे कायमस्वरुपी निर्मूलन करण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात येत आहे. या अंतर्गत बाजारपेठा, मुख्य रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे आणि भूखंड, समुद्रकिनारे, नाले व इतर जलस्रोतांच्या परिसरांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या सर्व कचऱ्यांच्या संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवून कचरा फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशाप्रकारचे निर्देश महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले. तसेच विभाग कार्यालयाच्या (वॉर्ड ऑफिस) सर्व सहायक आयुक्तांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात नियमितपणे स्वच्छताविषयक पाहणी करावी आणि व्यापक स्तरावर प्रभावीपणे स्वच्छता राहील, हे सुनिश्चित करावे, असेही निर्देश भिडे यांनी दिले आहेत. (BMC News)


उच्च न्यायालयाने काल घनकचरा व्यवस्थापन विषयाच्या अनुषंगाने दिलेल्या आदेशांनुसार, महानगरपालिकेच्या विविध विभागांची आढावा बैठक शनिवारी १ ऑगस्ट २०२६ रोजी महानगरपालिका मुख्यालयात पार पडली. त्यावेळी भिडे बोलत होत्या. अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सह आयुक्त (दक्षता) डॉ. एम. देवेंदर सिंह, उपायुक्त प्रशांत गायकवाड यावेळी उपस्थित होते. तसेच, सह आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, खाते प्रमुख आदी यावेळी उपस्थित होते. (BMC News)



उच्च न्यायालयाने कांजूरमार्ग कचरा प्रक्रिया प्रकल्पातील दुर्गंधी नियंत्रणामध्ये झालेल्या लक्षणीय सुधारणांबद्दल महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित कंत्राटदाराने केलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले आहे. याच अनुषंगाने, महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी सर्व परिमंडळीय उपायुक्त, सहायक आयुक्त आणि विभागस्तरावर (वॉर्ड) कार्यरत घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना मुंबईतील दृश्यमान स्वच्छता आणि कचऱ्यांच्या संवेदनशील ठिकाणांचे कायमस्वरूपी निर्मूलन यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले आहेत. (BMC News)



मुंबईत दृश्यमान स्वच्छता सुनिश्चित करण्याच्या अनुषंगाने, मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने वारंवार कचरा साचणारी ठिकाणे शोधली आहेत. त्यांची विभाग व परिमंडळनिहाय यादी गूगल नकाशावर चिन्हांकित करुन तयार केली आहे. या अंतर्गत आता प्रत्येक ठिकाणांचे संरचित प्रक्रियेद्वारे परीक्षण केले जाणार आहे. यामध्ये कचऱ्याचा स्रोत व प्रकार ओळखणे; संकलन, वाहतूक, मनुष्यबळ व यंत्रसामग्रीतील त्रुटींचे मूल्यांकन करणे; रहिवासी, बाजारपेठा व व्यावसायिक आस्थापनांशी संवाद करणे; जनजागृती व वर्तन बदल उपक्रम राबवणे; सीसीटीव्ही आधारित निगराणी व अंमलबजावणी करणे तसेच वारंवार नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, या बाबींचा प्रामुख्याने समावेश आहे. प्रभागनिहाय नोंदी, छायाचित्र पुरावे, डिजिटल मॅपिंग आणि नियमित आढाव्याद्वारे या मोहिमेचे संनियंत्रण केले जाईल. बाजारपेठा, मुख्य रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे व भूखंड, समुद्रकिनारे, नाले व इतर जलस्रोतांच्या परिसरात विशेष स्वच्छता व अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच, नाले, खाड्या व समुद्रात प्लास्टिक व घनकचरा जाण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक ठिकाणी नियंत्रणात्मक व इंटरसेप्शन प्रणाली अधिक मजबूत केली जाईल, असेही आश्विनी भिडे यांनी सांगितले. (BMC News)



दरम्यान, सहायक आयुक्त यांनी संबंधित परिसरात नियमित भेटी देऊन तिथे स्वच्छता सुनिश्चित करावी. स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन स्वच्छतेसाठी प्रभावीपणे कार्य करावे. परिमंडळ उपायुक्तांनी स्वच्छताविषयक कामकाजाचा साप्ताहिक आढावा घ्यावा तसेच स्वच्छतेत सकारात्मक सुधारणा होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. पावसाळ्यात रस्त्यालगत साचणारा कचरा सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी गंभीर धोका निर्माण करत असल्याने अशा ठिकाणांची नियमित स्वच्छता करावी. या ठिकाणचा कचरा त्वरित निष्कासित करावा आणि सातत्यपूर्ण देखरेख ठेवण्यावर विशेष भर द्यावा. वारसा स्थळे, पर्यटनस्थळे, प्रमुख सार्वजनिक परिसर तसेच नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या भागांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबवाव्यात. वारंवार कचरा टाकल्या जाणाऱ्या संवेदनशील ठिकाणांच्या मूळ कारणांचा अभ्यास करून सेवा सुधारणा, अभियांत्रिकी उपाययोजना, जनजागृती आणि सातत्यपूर्ण देखरेख यांच्या माध्यमातून अशा ठिकाणांचे कायमस्वरूपी निर्मूलन करण्यासाठी विशेष कृती आराखडा अवलंबावा, सर्व जीव्हीपींच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे निगराणी करुन कचरा फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, असेही भिडे यांनी सांगितले. तसेच, विभागस्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या आणि अधिकाधीक दंडात्मक कारवाई करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करावे, असेही त्यांनी सांगितले. (BMC News)


दृश्यमान स्वच्छता ही महानगरपालिकेसोबतच प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध आहे. उघड्यावर कचरा टाकण्याच्या घटनांना पूर्णतः आळा घालण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या सक्रिय सहभागातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी मुंबई घडविण्याचा आमचा प्रयत्न अधिक प्रभावीपणे सुरू राहील. तथापि, या उपक्रमांना नागरिक, रहिवासी संघटना, बाजार समित्या, स्वयंसेवी संस्था व लोकप्रतिनिधी, नागरिक आणि पर्यटकांनी सहकार्य करावे आणि अनधिकृतपणे कचरा टाकणाऱ्यांची माहिती प्रशासनाला कळवावी, असे आवाहन देखील आश्विनी भिडे यांनी केले आहे. (BMC News)

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.