Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग
August 12, 2026 05:05 PM
मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून एकत्र आणण्यासाठी पुण्यात ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’ या तीन दिवसीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा उपक्रम देशातील युवकांना एकत्र आणणारा महत्त्वाचा दुवा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची बैठक झाली. या बैठकीत युवा महोत्सवाच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. पुण्यातील बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे होणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून युवक सहभागी होणार आहेत.
प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून सुमारे 30 ते 35 प्रतिनिधी सहभागी होण्याचे नियोजन असून एकूण जवळपास 1,000 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 300, तर इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 700 युवकांचा समावेश असेल. या तीन दिवसांच्या महोत्सवाला राज्यभरातून 1 लाखांहून अधिक युवक भेट देतील, अशा पद्धतीने नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
या महोत्सवाची रचना ‘वॉरिअर’, ‘फ्युचर’ आणि ‘कल्चरल’ अशा तीन झोनमध्ये करण्याचे प्रस्तावित आहे. वॉरिअर झोनमध्ये स्वसंरक्षण, क्रीडा विज्ञान, पोषण, फिटनेस आणि क्रीडा मानसशास्त्रासोबत वॉल क्लायम्बिंग, आर्मी ऑब्स्टॅकल कोर्स आणि विविध साहसी उपक्रमांचा समावेश असेल.
फ्युचर झोनमध्ये तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि उद्योजकतेशी संबंधित उपक्रमांवर भर दिला जाणार आहे. तर कल्चरल झोनमध्ये महाराष्ट्राची लोककला, लोकसंगीत, लोकनृत्य, वारली आणि पैठणी कला, पारंपरिक खाद्यसंस्कृती यांचे दर्शन युवकांना घडवले जाणार आहे. योग, ध्यान, मानसिक आरोग्य आणि शाश्वत जीवनशैलीशी संबंधित उपक्रमही आयोजित केले जाणार आहेत.
महोत्सवासाठी ऑनलाइन नोंदणी, कागदपत्र पडताळणी, QR कोड आधारित डिजिटल ओळखपत्र, मोबाईल कार्यक्रम मार्गदर्शक आणि थेट सूचना अशा डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, महाराष्ट्राला क्रीडा क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीचा प्रभावी वापर करण्यासोबतच कॉर्पोरेट क्षेत्रातील क्रीडा संस्थांच्या सहकार्याने क्रीडा सुविधा विकसित करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.