Arjuna Award : बुद्धिबळात १९ व्या वर्षी विश्वविजेत्या झालेल्या महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखला अर्जुन पुरस्कार

वयाच्या १९व्या वर्षी विश्वविजेती, आता अर्जुन पुरस्काराची मानकरी; नागपूरच्या दिव्या देशमुखचा यशस्वी प्रवास


नागपूर : बुद्धिबळाच्या पटावर गेल्या काही वर्षांत सातत्याने ठसा उमटविणाऱ्या नागपूरच्या दिव्या देशमुखच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ अंतर्गत दिव्या देशमुखची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारने मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. बुद्धिबळपटू विदित गुजराथीसह दिव्याचीही अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यंदा एकूण १७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.



सातत्यपूर्ण कामगिरीची पावती


दिव्यासाठी हा केवळ पुरस्कार नसून गेल्या काही वर्षांतील तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीची पावती आहे. अवघ्या पाचव्या वर्षी बुद्धिबळाला सुरुवात करणाऱ्या दिव्याने अल्पावधीतच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. बालवयातच तिने जागतिक युवा स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवले. २०१४ मध्ये अंडर-१० आणि २०१७ मध्ये अंडर-१२ जागतिक विजेतेपद पटकावल्यानंतर २०२४ मध्ये तिने अंडर-२० जागतिक ज्युनियर मुलींच्या स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवले. २०२४ च्या या स्पर्धेत दिव्याने ११ पैकी १० गुण मिळवत अजिंक्य राहत विजेतेपद मिळवले.



ऑलिम्पियाडमध्येही चमक


२०२४ हे वर्ष दिव्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे ठरले. बुडापेस्ट येथे झालेल्या ४५व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय महिला संघाने प्रथमच सुवर्णपदक जिंकले. या ऐतिहासिक कामगिरीत दिव्याचा महत्त्वाचा वाटा होता. तिने तिसऱ्या पटावर खेळताना ११ पैकी ८ विजय आणि तीन बरोबरींसह ९.५ गुण मिळवले. तिची कामगिरीची रेटिंग २६०८ इतकी राहिली आणि तिला वैयक्तिक सुवर्णपदकही मिळाले. विशेष म्हणजे ती स्पर्धेतील भारताची सर्व ११ सामने खेळणारी खेळाडू होती आणि एकही सामना हरली नाही.



विश्वचषकाने बदलला इतिहास


दिव्याच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने वेगळी उंची मिळाली ती २०२५ मध्ये. जॉर्जियातील बातुमी येथे झालेल्या फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषकात तिने अंतिम फेरीत भारताचीच अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीचा पराभव करत विजेतेपद मिळवले. तीन दिवस चाललेल्या अंतिम सामन्यातील टायब्रेकरमध्ये दिव्याने निर्णायक विजय मिळवला. या विजयासह दिव्या महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. विश्वचषक विजेतेपदामुळे तिला थेट ग्रँडमास्टर किताबही मिळाला. ती भारताची ८८वी ग्रँडमास्टर आणि ग्रँडमास्टर किताब मिळवणारी चौथी भारतीय महिला ठरली. विश्वचषक विजेतेपदामुळे २०२६ च्या महिला कॅंडिडेट्स स्पर्धेसाठीही तिचा मार्ग मोकळा झाला.



पाचव्या वर्षी सुरुवात, १९व्या वर्षी विश्वविजेतेपद


नागपूरमध्ये जन्मलेल्या दिव्याने वयाच्या पाचव्या वर्षी बुद्धिबळाचे धडे घेण्यास सुरुवात केली. तिच्या आई-वडिलांचा व्यवसाय वैद्यकीय क्षेत्रातील असला तरी दिव्याने बुद्धिबळाची निवड केली आणि त्यातच आपली कारकीर्द घडवली. सातव्या वर्षी तिने राष्ट्रीय अंडर-७ विजेतेपद मिळवले. त्यानंतर जागतिक युवा स्पर्धांमधील यशाची मालिका सुरू राहिली. २०२१ मध्ये तिने वुमन ग्रँडमास्टरचा किताब मिळवला, तर २०२३ मध्ये इंटरनॅशनल मास्टरचा किताब मिळवला. २०२२ मध्ये तिने भारतीय महिला अजिंक्यपदही जिंकले. २०२३ मध्ये आशियाई महिला अजिंक्यपदावर नाव कोरत तिने वरिष्ठ स्तरावरील आपली क्षमता सिद्ध केली. अशा प्रकारे बालवयातील जागतिक विजेतेपदांपासून ज्युनियर विश्वविजेतेपद, ऑलिम्पियाड सुवर्णपदक आणि अखेर महिला विश्वचषक विजेतेपदापर्यंत दिव्याचा प्रवास झाला आहे. आता अर्जुन पुरस्काराच्या रूपाने तिच्या या सातत्यपूर्ण आंतरराष्ट्रीय कामगिरीवर राष्ट्रीय पातळीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

Comments
Add Comment

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त