महापे : नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरातील पी. के. डेअरीवर धाड टाकून अन्न व औषध प्रशासनाने भेसळ केलेले ७६१ लिटर दूध जप्त करून नष्ट केले. दूध भेसळीसाठी स्किम मिल्क पावडरचा पुरवठा करणाऱ्या भास्कर डेअरीवरही कारवाई करून ५४८ किलो साठा जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने पी. के. डेअरीचा व्यवसाय तात्काळ बंद केला आहे तसेच भास्कर डेअरीचा अन्न परवाना निलंबित केला आहे.
ठोस गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने पी. के. डेअरीवर धाड टाकली. धाड टाकली त्यावेळी डेअरी परिसरात आयशर कंपनीचा दूध टँकर उभा होता. टँकरवर असलेल्या शिवेंद्र श्यामलाल जैस्वाल (३४) याला दुधाची पाकिटे फोडून त्यातील दूध, स्किम्ड मिल्क पावडर आणि चिलरच्या साहाय्याने थंड केलेले पाणी यांचे मिश्रण तयार करून ते टँकरमधील दुधात मिसळताना पथकाने मुद्देमालासह पकडले. चौकशीदरम्यान एका किलो स्किम मिल्क पावडरमध्ये आठ ते दहा लिटर थंड पाणी मिसळून मिश्रण तयार केले जात असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या लक्षात आले. नंतर प्लंजरच्या साहाय्याने हे मिश्रण एकजीव करून टँकरमधील गायीच्या आणि म्हशीच्या दुधात मिसळले जात होते. भेसळीचे काम प्रदीप यादवच्या माध्यमातून सुरू असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासा आढळले. भेसळयुक्त दूध गायीचे आणि म्हशीचे दूध असल्याचे सांगून ठाणे, ऐरोली, कोपरी, दिघा आणि घणसोली परिसरातील विविध दूध डेअऱ्यांना पुरविले जात असल्याचेही तपासात उघड झाले. भेसळीसाठी पाश्चराईज्ड होमोजेनाईज्ड गायीचे दूध, पाश्चराईज्ड फुल क्रीम मिल्क, पाणी आणि स्किम मिल्क पावडर परिसरातील विक्रेत्यांकडून खरेदी केले जात होते.
अन्न व औषध प्रशासनाने घटनास्थळांवरून दुधाचे नमुने प्रयोगशाळेतील सखोल तपासणीसाठी जप्त केले आहेत. पी. के. डेअरीकडे आवश्यक अन्न परवाना नसल्यामुळे अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार नोटीस बजावून या डेअरीचा व्यवसाय तात्काळ बंद करण्यात आला. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने उर्वरित दूधसाठा भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून ३९३ लिटर म्हशीचे दूध आणि ३६८ लिटर गायीचे दूध, असा एकूण ७६१ लिटर दूधसाठा जप्त करण्यात आला. या साठ्याची एकूण किंमत ४० हजार ५५८ रुपये असून, संपूर्ण साठा नष्ट करण्यात आला.
पी. के. डेअरीला स्किम मिल्क पावडर पुरविणाऱ्या भास्कर डेअरीतून स्किम्ड मिल्क पावडर आणि पनीरचे नमुने घेण्यात आले. तसेच भास्कर डेअरीतून कमी दर्जाचा ५४८ किलो साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या साठ्याची किंमत एक लाख ८३ हजार ३२० रुपये आहे. अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील विविध तरतुदींचे उल्लंघन आढळल्याने भास्कर डेअरीचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त आणि नष्ट
अन्न सुरक्षा परवाना नसल्यामुळे मे. पी. के. डेअरीचा व्यवसाय तत्काळ बंद करण्यात आला. या संपूर्ण मोहिमेदरम्यान विविध डेअऱ्यांमधून एकूण ४,७१० लिटर भेसळयुक्त व संशयित दूध (किंमत ₹१,८५,७८०/-) जप्त करून सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षेसाठी नष्ट करण्यात आले. याशिवाय १२९.५ किलो पनीर (किंमत ₹४५,२८०/-), ४७३ किलो स्किम्ड मिल्क पावडर (किंमत ₹१,६०,८२०/-) आणि ८८.४ किलो क्रीम (किंमत ₹३०,९४०/-) असा एकूण लाखो रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. तपासणीदरम्यान मे. पी. के. डेअरीतून ३९३ लिटर म्हशीचे आणि ३६८ लिटर गायीचे असे एकूण ७६१ लिटर दूध (किंमत ₹४०,५५८/-) जागेवरच नष्ट केले गेले. पुरवठादार मे. भास्कर डेअरी (महापे) येथून ५४८ किलो संशयित पावडर व पनीर (किंमत ₹१,८३,३२०/-) जप्त करून परवाना निलंबित करण्यात आला. मे. नारायण डेअरी (रबाळे) कडील प्रयोगशाळा अहवाल नसलेला ३,६४८ लिटर पाश्चराईज्ड स्किम्ड दुधाचा साठा (किंमत ₹१,२४,०३२/-) नष्ट करण्यात आला, तर मे. फत्तेसिंगराव नाईक सहकारी दूध संघाकडून ८८.४ किलो क्रीम जप्त करण्यात आले.
१५ जणांवर गुन्हा दाखल
तुर्भे पोलीस ठाण्यात २२ ऑगस्ट २०२६ रोजी प्रथम खबर अहवाल (FIR क्र. ४३५/२०२६) दाखल करण्यात आला असून संबंधित पेढ्यांचे अन्न परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या गुन्ह्यामध्ये शिवेंद्र श्यामलाल जैस्वाल, प्रदीप कमलेश यादव, भास्कर संतु पिलानी यांच्यासह मे. महाराज डेअरी (ऐरोली), मे. विजय डेअरी (घणसोली), मे. शिवकैलास डेअरी (ऐरोली), मे. रूपसागर डेअरी (ऐरोली), मे. दिनेश डेअरी (ऐरोली), मे. बालाजी डेअरी (ऐरोली), मे. शुक्लम् डेअरी (दिघा), मे. श्रीराम डेअरी (कोपरी, ठाणे), मे. वासुदेव डेअरी (कोपरी, ठाणे), मे. राधाकृष्ण डेअरी (कोपरी, ठाणे), मे. जनम डेअरी (साकेत, ठाणे) आणि मे. देवनारायण डेअरी (आझाद नगर, ब्रह्मांड, ठाणे) या १५ व्यक्ती व पेढ्यांचा समावेश आहे.
विक्री करण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये भेसळ असल्याचा संशय असल्यास नागरिकांनी टोल-फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५ वर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.