CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रातील युवकांच्या कौशल्य, रोजगारक्षमता, उद्योजकता आणि नावीन्यता विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. राज्यात टाटा स्ट्राइव्हचे कार्य २०१५ पासून सुरू असून, नवी मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक येथे मोठी कौशल्य विकास केंद्रे कार्यरत आहेत. या उपक्रमातून रोजगार वाढीसाठी चालना मिळेल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. (CM Devendra Fadnavis)


नागपूर केंद्राचे नुकतेच २६ जुलै २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या सर्व मोठ्या केंद्रांमधून आतापर्यंत ८ हजारांहून अधिक युवकांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे.


कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. टाटा स्ट्राइव्हच्या विविध विस्तार व भागीदार केंद्रांमधूनही ६ हजारांहून अधिक प्रशिक्षणार्थींना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. ठाणे येथे वातानुकूलन क्षेत्रासाठी, तर पुणे आणि भिलवडी (सांगली) येथे ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी विशेष प्रशिक्षण सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. याशिवाय तळोजा आणि नागपूर येथे बहुकौशल्य प्रशिक्षण केंद्रे कार्यरत आहेत.



आयटीआयमध्ये ‘ड्युअल व्हीईटी’ कार्यक्रम


टाटा स्ट्राइव्हने सिमेन्सच्या भागीदारीत राज्यातील २७० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) ड्युअल व्हीईटी कार्यक्रम राबविला आहे. या माध्यमातून ६०० हून अधिक प्रशिक्षकांना अध्यापनशास्त्रीय कौशल्यांचे प्रशिक्षण, तर ३५ हजारांहून अधिक प्रशिक्षणार्थींना उद्योग व प्रकल्पांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला आहे. प्रशिक्षणार्थींना आयटीआयच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षात ऑन द जॉब ट्रेनिंग प्रशिक्षणाची संधी देण्यात येते.


बजाज ऑटो लिमिटेडच्या सहकार्याने मागील वर्षी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ११ शासकीय व ७ खासगी (एकूण १८) आयटीआयमध्ये टोटल प्रॉडक्टिव्ह मेंटेनन्सच्या तत्त्वांवर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. बजाज मॅन्युफॅक्चरिंगच्या ‘बजाज ऑनलाईन लर्निंग अँड डिस्कव्हरी’ या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिमवर अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी ३,५०० हून अधिक प्रशिक्षणार्थींची नोंदणी करण्यात आली होती. हा उपक्रम सध्या राज्यातील ९०० हून अधिक आयटीआयमध्ये राबविण्यात येत असून, त्यामध्ये ८०,००० हून अधिक प्रशिक्षणार्थींची नोंदणी झाली आहे. (CM Devendra Fadnavis)



उद्योजकता आणि डिजिटल कौशल्यांवरही भर


महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हने १८०० हून अधिक व्यक्तींना उद्योजकतेचे प्रशिक्षण दिले असून, व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक व मार्गदर्शनात्मक सहाय्य करण्यात आले आहे. सह्याद्री फार्म्स, टाटा कॅपिटल, टाटा कम्युनिकेशन, सिडबी, ओरिजनल कॉम्पोसिट कंपनी, आणि महाराष्ट्र राज्य कौशल विकास सोसायटी यांसारख्या संस्थांनी या उपक्रमाला सहकार्य केले आहे.


मायक्रोसॉफ्ट, गुगल आणि ॲमेझॉनच्या भागीदारीत राबविण्यात आलेल्या डिजिटल कार्यक्रमांतून महाराष्ट्रातील ४,००० हून अधिक प्रशिक्षणार्थींना सायबर सिक्युरिटी, आयटी सिस्टिम्स, डिजिटल मार्केटिंग, यूएक्स डिझाइन आणि क्लाऊड कम्प्युटिंग यांसारख्या क्षेत्रांत प्रशिक्षण देण्यात आले आहे.



महाराष्ट्र शासनासोबत व्यापक सामंजस्य करार


राज्य शासनाचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्य विभाग, आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्ट यांच्यात १५ जुलै २०२२ रोजी सामंजस्य करार झाला. रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण, उद्योजकता व नवोन्मेष विकास, समुदायाधारित उद्योगांना बळकटी, शासकीय आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढविणे, कौशल्य प्रशिक्षणासाठी पायाभूत सुविधा विकसित करणे, प्रशिक्षकांची क्षमता वाढविणे आणि ड्युअल व्हीईटी कार्यक्रमाचा विस्तार यांचा या करारात समावेश आहे. (CM Devendra Fadnavis)



पिंपरी-चिंचवडमधील ५ हजार बचतगटांना बळकटी


टाटा स्ट्राइव्ह, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसोबत ‘प्रोजेक्ट सक्षमा’ अंतर्गत तीन वर्षांत ५ हजार बचतगटांना बळकटी देण्यासाठी २०२३ पासून काम सुरु आहे. बचतगटांचे आधारभूत सर्वेक्षण, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माहिती संकलन व प्रगतीचे निरीक्षण, प्रशिक्षण, उपजीविकेची मॉडेल्स विकसित करणे आणि बाजारपेठेशी जोडणी यावर या उपक्रमाचा भर आहे. यासाठी टाटा स्ट्राइव्हने पिंपरी-चिंचवड परिसरात तांत्रिक सहाय्य कक्ष स्थापन केला असून, डिसेंबर २०२३ पासून सुमारे १० हजार बचतगटांचे सहभागी पद्धतीने आधारभूत सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी ५ हजार हून अधिक सक्रिय बचतगटांना विविध प्रशिक्षण आणि सहाय्याच्या माध्यमातून त्यांना अधिक सक्षम करण्याचे काम सुरू आहे.



महाविद्यालयांमध्ये कौशल्य अभ्यासक्रमासाठी सहकार्याची तयारी


महाराष्ट्रातील विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये कौशल्य अभ्यासक्रम सुरू करण्याच्या शासनाच्या उपक्रमात सहभागी होण्याची तयारी टाटा स्ट्राइव्हने दर्शविली आहे. उद्योगाच्या गरजांशी सुसंगत अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी विद्यापीठे व महाविद्यालयांसोबत काम करण्याची; तसेच अनुभवी प्रशिक्षक आणि उद्योगतज्ज्ञांच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण देण्याची भूमिका संस्थेने मांडली आहे.



'टाटा स्ट्राईव्ह'सोबतचे हे सहकार्य अधिक पुढे घेवून जाणार : मनीषा वर्मा


कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा म्हणाल्या की,"आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे ऑन-द-जॉब ट्रेनिंग आणि प्लेसमेंट वाढवण्यासाठी आम्ही 'टाटा स्ट्राईव्ह', सीमेन्स आणि बजाज यांच्या सहकार्याने ड्युअल व्होकेशनल एज्युकेशन सिस्टीम राबवत आहोत. यात 'टाटा स्ट्राईव्ह' हे आमचे प्रमुख पार्टनर आहेत. भविष्यात तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी सक्षम बनवत उद्योजकतेला चालना देण्यासाठी 'टाटा स्ट्राईव्ह'सोबतचे हे सहकार्य अधिक पुढे घेवून जाणार आहोत." (CM Devendra Fadnavis)

Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी