Maharashtra Cabinet Decisions : नागपूरमध्ये लता मंगशेकर विद्यापीठ, खेळाडूंच्या रोख बक्षीस धोरणात सुधारणा यांसह राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत जनहिताचे चार निर्णय झाले. क्रीडा, उच्च व तंत्रशिक्षण, महसूल तसेच विधी व न्याय विभागाशी संबंधित प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. बैठकीआधीच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ वितरित करण्यासाठी पुढच्या टप्प्याची प्रक्रियाही सुरू झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा आतापर्यंत वितरित केलेला लाभाची सविस्तर माहिती दिली.





राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पारितोषिकांच्या रकमेत भरीव वाढ : आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडू व त्यांचे मार्गदर्शक यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्याच्या योजनेत नॅशनल गेम्सह, खेलो इंडिया तसेच दिव्यांगाच्या आणखी सहा स्पर्धांचा समावेश करण्यास तसेच रोख पारितोषिक योजनेत सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठीच्या रोख पारितोषिकात भरीव वाढ करण्यात आली असून सुवर्ण पदकासाठी सात लाख (पूर्वी 5 लाख), रौप्यसाठी पाच लाख (पूर्वी 3 लाख) तर कांस्यसाठी तीन लाख (पूर्वी दीड लाख) अशी वाढ करण्यात आली आहे. वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्ससाठी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकासाठी अनुक्रमे १० लाख, ७ लाख, ५ लाख रुपये तर नॅशनल गेम्ससाठी अनुक्रम ७ लाख,५ लाख, ३ लाख रुपये आणि खेलो इंडियातील पदकासाठी अनुक्रम ३ लाख,२ लाख,१लाख रुपये अशी तरतूद करण्यात आली आहे. युथ ऑलिम्पिक आणि युथ पॅरा ऑलिंपिक स्पर्धेतील विजेत्यांच्या पारितोषिकांच्या रकमेत भरीव वाढ करण्यात आली आहे. सुवर्ण पदासाठी २२.५० वरून ५० लाख, रौप्यसाठी १५ वरून ३० लाख तर कांस्य पदासाठी ७.५ वरून २० अशी वाढ करण्यात आली आहे. टेनिस, बॅडमिंटन आणि हॉकी संदर्भातील स्पर्धांचाही यात समावेश करण्यात आला. टेनिसच्या चार वेगवेगळ्या ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला तीन कोटी रुपये तर उपविजेत्यास दोन कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. बॅडमिंटन स्पर्धेतील थॉमस कप, उबर कप, सदीरमन कप या स्पर्धांतील विजयी खेळाडूला ४० लाख तर उपविजेत्यास २० लाख अशी तरतूद करण्यात आली आहे. हॉकी स्पर्धांत अझलन शाह कप (वरिष्ठ) आणि चॅम्पीयन ट्रॉफीसाठी विजेत्यास ४० लाख तर उपविजेत्यास २० लाख आणि सुलतान जोहर कप (कनिष्ठ) विजेत्यास २० लाख तर उपविजेत्यास १० लाख रुपये पारितोषिक मिळणार आहे. खेळाडूंना यशात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकांचाही यथोचित सन्मानाची तरतूद यात करण्यात आली. क्रीडा मार्गदर्शकास खेळाडूच्या रोख पारितोषिक रकमेच्या १० टक्के रक्कम बक्षिस म्हणून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. खेळाडूने प्रमाणित केलेल्या मार्गदर्शकांना हे पारितोषिक दिले जाणार आहे. जास्तीत जास्त तीन क्रीडा मार्गदर्शकांना हे पारितोषिक विभागून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये प्राथमिक प्रशिक्षण देणाऱ्यास ३० टक्के, कौशल्य विकास करणाऱ्यास ३० टक्के तर अंतिम व प्रगत प्रशिक्षण देणाऱ्यास ४० टक्के असे पारितोषिक सूत्र ठरवण्यात आले आहे. बदलत्या काळानुसार आणि क्रीडा क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेनुसार, या योजनेचा पुनर्विचार करून ती अधिक सर्वसमावेशक, तर्कसंगत आणि खेळाडू-केंद्रित बनवता त्यात अनेक क्रीडा स्पर्धांचाही समावेश करण्यात आला आहे. वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स, नॅशनल गेम्स आणि खेलो इंडिया (सर्व प्रकार) स्पर्धेचा यात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर कर्णबधीर (डेफ), अंध आणि विशेष ऑलिम्पिकसाठी नव्याने स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये कर्णबधीर (डेफ) ऑलिम्पिक, आयबीएसए वडर्ल् चॅम्पियनशिप, वर्ल्ड कप,वर्ल्ड गेम्स, अंध क्रिकेट वर्ल्ड कप, विशेष ऑलिंम्पिक, वर्ल्ड गेम्स फॉर मेंटली चॅलेन्जड, डेफ वर्ल्ड चॅम्पियनशिप, वर्ल्ड कप (वरिष्ठ गट) या स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर सध्याच्या आठ देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धांची अट शिथिल करून देशांच्या सहभागानुसार पारितोषिकाची रक्कम ठरवली जाणार आहे. सांघिक प्रकारात १२ देशांचा तर वैयक्तिक प्रकारात १६ देशांचा समावेश असणाऱ्या स्पर्धेतील विजयासाठी १०० टक्के पूर्ण रक्कम, सांघिक ६ ते १२ देशांचा आणि वैयक्तीक ८ ते १२ देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धांसाठी ५० टक्के रक्कम तर सांघिक ४ ते ५ देशांचा समावेश आणि वैयक्तिकमध्ये ४ ते ७ देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धांसाठी २५ टक्के रक्कम पारितोषिक म्हणून दिली जाणार आहे. यामुळे जास्तीत जास्त खेळाडूंना याचा लाभ होणार आहे. याबाबतचा शासन निर्णयही लवकरच काढण्यात येणार आहे.



नागपूर येथे लता मंगशेकर विद्यापीठ, अहिल्यानगर येथे डॉ. बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठ : नागपूर येथे लता मंगेशकर विद्यापीठ तर अहिल्यानगर येथे डॉ. बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठ अशी दोन खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थापन करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. नागपूर येथे व्ही.एस.पी.एम अँकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन या संस्थेने खासगी आरोग्य विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव दिला होता. या विद्यापीठात वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, फिजिओथेरपी आणि नर्सिंग विद्याशाखांमधील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशॅलिटी अभ्यासक्रम सुरु होणार. संस्थेकडे १ हजार १३८ खाटांचे सूसज्ज रुग्णालय आहे. तर अहिल्यानगर येथे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन या संस्थेने असे विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव दिला होता. या विद्यापीठाकडे वैद्यक विद्याशाखेतील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम शिकवण्याची व्यवस्था आहे. तसेच सर्व सुविधांनी युक्त असे ८३० खाटांचे रुग्णालय देखील आहे.



जत नगरपरिषदेस प्रशासकीय इमारतीसाठी जमीन : सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषदेस प्रशासकीय इमारतीच्या उभारणीसाठी जमीन देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मौजे जत येथील सर्व्हे क्रमांक ५१०/२३/१ मधील एकूण ६६०० चौ.मी. क्षेत्रापैकी २५८५ चौ.मी. शासकीय जमीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी जत नगरपरिषदेस देण्यात येणार आहे. ही जमीन नगर विकास विभागामार्फत कब्जेहक्काने, भोगाधिकार मूल्यरहित व महसूलमुक्त किंमतीने, भोगवटादार वर्ग-२ या धारणाधिकाराने प्रदान करण्यास देण्यात आली आहे. या जमिनीचा वापर केवळ मंजूर प्रयोजनासाठी करणे बंधनकारक राहणार असून, शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय जमीन हस्तांतरित, गहाण अथवा तारण ठेवता येणार नाही. तसेच जमिनीवर अन्य व्यक्ती, संस्था किंवा कंपनीचे हक्क निर्माण होतील अशा प्रकारचे आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत आणि पूर्वमान्यतेशिवाय जमिनीचे पोटविभाजन करता येणार नाही. जमीन प्रदानाच्या अनुषंगाने महसूल व वन विभागाच्या संबंधित शासन निर्णयातील तरतुदींनुसार जिल्हाधिकाऱ्यांसोबत करारनामा करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक असेल. मंजूर प्रयोजनासाठी जमिनीचा वापर बंद झाल्यास ती जमीन महाराष्ट्र शासनास विनामोबदला परत करावी लागेल. जमिनीवरील अतिक्रमणे काढण्याची किंवा त्यांची अन्यत्र व्यवस्था करण्याची तसेच मंजूर जमिनीचे संरक्षण करण्याची जबाबदारी जत नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची राहणार आहे. या जमिनीच्या संदर्भात कोणताही न्यायालयीन अथवा अन्य प्रकारचा वाद निर्माण झाल्यास त्याची जबाबदारीही जत नगरपरिषदेची राहील.



पिंपळगाव बसवंत येथे वरिष्ठ स्तराचे दिवाणी न्यायालय : नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे पिंपळगाव बसवंत व परिसरातील नागरिकांना न्यायालयीन सेवा अधिक सुलभ आणि जलद उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या न्यायालयासाठी मंजूर न्यायिक अधिकाऱ्यांच्या नियमित पदांमधून तसेच सहाय्यभूत कर्मचाऱ्यांच्या नियमित पदांमधून आवश्यक पदे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरासाठी एक दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, एक अधीक्षक, दोन सहाय्यक अधीक्षक, एक लघुलेखक ग्रेड-२, दोन वरिष्ठ लिपिक आणि आठ कनिष्ठ लिपिक, अशी एकूण १५ नियमित पदे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय न्यायालयाच्या कामकाजासाठी बाह्ययंत्रणेद्वारे चार मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासही मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये दोन शिपाई, एक पहारेकरी आणि एक सफाईगार यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल