Monday, August 31, 2026

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना. गिरीश महाजन (Guardian Minister Girish Mahajan) यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ‘उन्नत नाशिक अभियान’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन ग्रीन मान्सून’ या हरित मोहिमेचा १० वा टप्पा रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गंगापूर धरण परिसरातील चैतन्य फार्मसमोर आयोजित कार्यक्रमात ५ हजार देशी वृक्षांच्या लागवडीस सुरुवात करण्यात आली.

‘मिशन ग्रीन मान्सून’ (Mission Green Monsoon) ही केवळ वृक्षारोपणाची मोहीम न राहता वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण जनजागृतीची व्यापक लोकचळवळ बनत आहे. उपक्रमात गंगापूर धरण परिसरातील ग्रामस्थ, सामाजिक संस्था, युवक, पर्यावरणप्रेमी नागरिक तसेच विविध शासकीय यंत्रणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. (Nashik News)

५५ हजारांहून अधिक वृक्षांचा महत्त्वपूर्ण टप्पा

रविवारी १० व्या टप्प्यासह ‘मिशन ग्रीन मान्सून’ने ५५ हजारांहून अधिक वृक्षांचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ४४,५०० देशी वृक्षांची प्रत्यक्ष लागवड पूर्ण करण्यात आली असून, मागणीनुसार १०,७७५ देशी रोपांचे वाटप करण्यात आले आहे. प्रत्यक्ष लागवड आणि वृक्षवाटप मिळून आतापर्यंत ५५,२७५ वृक्षांचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. ही कामगिरी नाशिकमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी निर्माण होत असलेल्या व्यापक लोकसहभागाचे आणि ‘उन्नत नाशिक अभियान’च्या सातत्यपूर्ण वाटचालीचे द्योतक मानली जात आहे. (Nashik News)

धरण-कालवा परिसरात २५ हजार वृक्षलागवडीचा संकल्प

‘उन्नत नाशिक अभियान’ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील धरणे आणि कालवे परिसरात २५ हजारांहून अधिक देशी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प जलसंपदा विभागाने केला आहे. या महत्त्वाकांक्षी हरित उपक्रमाची सुरुवात आज गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांच्या लागवडीने करण्यात आली. आगामी काळात धरण परिसरातील मोकळ्या जागा, कालवा परिसर तसेच उपलब्ध शासकीय जागांवर स्थानिक पर्यावरणाला अनुरूप देशी वृक्षांच्या प्रजातींची लागवड करण्यात येणार आहे. त्यासोबतच लावलेल्या वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन करण्यावरही विशेष भर दिला जाणार आहे. (Nashik News)

'एक झाड-एक जबाबदारी’चा संदेश

रविवारी १० व्या टप्प्यात गंगापूर धरण परिसरात वृक्ष लागवडीच्या वेळी महापौर हिंगोली ताई आडके, तालुका पोलीस निरीक्षक सुनंदा नाईक, गोवर्धन गावचे सरपंच लखन बेंडकुळे तसेच ग्रामस्थ, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, पर्यावरणप्रेमी राजेश पंडित, चंदू पाटील,सुनील मेढेकर, युवक आणि जलसंपदा विभागातील राजेश जी गोवर्धने, सोनल शहाणे मिलिंद काळे व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव यांनी कार्यक्रमाचे समन्वय केले

‘एक झाड-एक जबाबदारी’ या भावनेतून वृक्षलागवड आणि संवर्धनाचा संदेश देत या सर्वांनी नाशिकच्या हरित परिवर्तनाला बळ दिले. नाशिकच्या विकासासोबतच पर्यावरणाचे संवर्धन, जलस्रोतांचे संरक्षण आणि शहर-जिल्ह्याची हरित आच्छादन वाढविण्याच्या उद्देशाने सुरू असलेले ‘मिशन ग्रीन मान्सून’ आगामी काळात आणखी व्यापक करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >