Monday, August 31, 2026

Nashik News : समृध्दी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना, लुटीच्या घटनांनंतर पोलीस सतर्क

Nashik News : समृध्दी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना, लुटीच्या घटनांनंतर पोलीस सतर्क

Nashik News : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या तीन ते चार घटनांमुळे चर्चेत आला. समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) सिन्नर आणि वावी हद्दीत एकाच रात्री घडलेल्या ‘टायर फोडा आणि लुटा’ या प्रकारानंतर जिल्हा पोलीस दल सतर्क झाले आहेत. जिल्हा पोलीस दलाने (Rural Police Force) महामार्गाच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना केल्या असून गुन्हेगारांच्या या नव्या मोडस ऑपरेंडीला उत्तर देण्यासाठी पोलिसांनी ९६ किलोमीटरच्या पट्ट्यात २४ तास पॅट्रोलिंग शिल्ड तैनात केले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष कृती आराखडा लागू केला आहे.

प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मलढोण आणि दुशिंगपूर शिवारात गुरुवारी मध्यरात्री दरोडेखोरांच्या टोळक्याने वाहनांच्या मार्गात खिळे आणि धारदार लोखंडी वस्तू टाकून वाहनांचे टायर पंक्चर करुन लुटमारी केली. दीड तास लूटमार केली जात असतानाही महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेला त्याचा थांगपत्ताही न लागल्याने प्रवाशांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले. गुरुवारी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर येथील एक कुटुंब मोटारीने मुंबईच्या दिशेने निघाले होते. रस्त्यावर टाकलेल्या लोखंडी वस्तूंमुळे मोटारीचे टायर फुटले. त्यामुळे मोटार थांबताच दबा धरून बसलेल्या १० ते १२ जणांच्या टोळक्याने संधी साधली. भयभीत झालेल्या मोटारीतील सर्वांनी अंगावरील सोन्याचे दागिने, घड्याळे आणि ८४ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण १८ लाख ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटारुंना दिला. या घटनेनेतर अजून एक प्रकार घडला.हातात धारदार हत्यारे घेतलेले पाच ते सहा जण समृध्दी महामार्गावर कठडे ओलांडून मोटारीकडे धावत आले. धोका पाहून व्यावसायिकाने स्वत:कडे असलेल्या परवानाधारक बंदुकीूतने हवेत दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे लुटारु पळून गेले. त्यानंतर पाठीमागून आलेल्या वावी पोलिसांनी सर्व माहिती घेतली.

२४ तास पॅट्रोलिंग शिल्ड तैनात

जिल्ह्यात वावी, सिन्नर, घोटी आणि इगतपुरी या चार पोलीस ठाण्यांच्या (Police Station) हद्दीतून समृद्धी महामार्गाचा ९६ किलोमीटरचा टप्पा जातो. निर्जन रस्ते आणि वेगाचा फायदा घेऊन गुन्हेगारी टोळ्या या भागात सक्रिय होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. ​गुन्हेगारांच्या या नव्या मोडस ऑपरेंडीला उत्तर देण्यासाठी पोलिसांनी ९६ किलोमीटरच्या पट्ट्यात २४ तास पॅट्रोलिंग शिल्ड तैनात केले आहे. त्यासोबतच घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी स्वतः समृद्धी महामार्गावर उतरून परिस्थितीची आणि सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. संशयित टोळीचा (Suspect Gang) तपास वेगाने सुरू असल्याचे सांगत त्यांनी वाहनधारकांना दिलासा दिला आहे. या घटनांची गंभीर दखल घेण्यात आली असून डाॅ. स्वामी हे स्वतः मागील काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर प्रत्यक्ष भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा