Monday, August 31, 2026

Chemical Leak : चेंबूरमध्ये टँकरमधून बेन्झीनची गळती; म्हैसूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण

Chemical Leak : चेंबूरमध्ये टँकरमधून बेन्झीनची गळती; म्हैसूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याने खळबळ उडाली. म्हैसूर कॉलनी मोनोरेल स्टेशनजवळ रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. टँकरमधून गळती सुरू झाल्यानंतर परिसरात धूर आणि दुर्गंधी पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ( Chemical Leak)

मिळालेल्या माहितीनुसार, RCF पोलीस ठाण्याच्या हद्दीत टँकर क्रमांक GJ 05 CU 9629 मधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान, महापालिका कर्मचारी आणि BPCL चे तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले.

गळती होत असलेल्या टँकरमधील केमिकल सुरक्षितपणे दुसऱ्या टँकरमध्ये हलवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले. बेन्झीन हे धोकादायक रसायन असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळाच्या आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. नागरिकांना घटनास्थळापासून दूर ठेवण्यासाठी आवश्यक बंदोबस्त करण्यात आला आहे. ( Mumbai Fire Brigade)

घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरात डिमार्केशन करण्यात आले असून वाहतूकही काही प्रमाणात वळवण्यात आली आहे. अग्निशमन दल आणि BPCL चे तज्ज्ञ गळती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, टँकरमधून नेमकी कोणत्या कारणामुळे बेन्झीनची गळती झाली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नसली तरी खबरदारी म्हणून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. ( Chembur Accident)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा