Tuesday, September 1, 2026

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस , शुभेच्छांचा वर्षाव, नातेवाईकांची लगबग क्षणात संपलं. पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागातील सारोळा रोड परिसरात झोळीत झोपलेल्या एक वर्षीय संघर्ष पाटील या बालकाचा गळफास लागून दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी घडलेल्या या घटनेनं पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Jalgaon News)

नेमकं काय घडलं ?

पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागातील सारोळा रोड परिसरात राहणारे सैनिक राहुल बापुराव पाटील (बागले) यांचा मुलगा संघर्ष याचा रविवारी पहिला वाढदिवस होता. पहिला वाढदिवस असल्याने वाढदिवसाचा उत्साह होता , त्यासाठी घरात मोठी तयारी सुरु होती. नातेवाईकांची लगबग होती. रविवारी संघर्षचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला मात्र दुसऱ्या दिवशी भयानक घडलं. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास संघर्षला नेहमीप्रमाणे घरातील झोळीत झोपवण्यात आले होते. तो झोपेतून खाली घरंगळत पडू नये, यासाठी त्याच्या पोटाला रुमालाने बांधण्यात आले होते. बाळ झोपेत असताना त्याची सुरक्षितता राहावी, या उद्देशाने कुटुंबीयांनी ही व्यवस्था केली होती. (Jalgaon News)

...अन् काळाने घाला घातला

मात्र, झोळीत झोपलेल्या संघर्षची हालचाल झाली आणि तो झोक्याच्या पायथ्याकडे सरकला. अन इथेच काळाने झडप घातली. त्यावेळी त्याच्या पोटाला बांधलेला रुमाल वर सरकत गळ्याजवळ आला. त्यातून त्याला गळफास बसल्याची दुर्दैवी घटना घडली. काही वेळाने संघर्षची आई झोक्याकडे पाहण्यासाठी गेली असता मुलाच्या गळ्याला रुमालाचा फास बसल्याचे तिच्या निदर्शनास आले. हे दृश्य पाहून आईने आरडाओरड केली. त्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ संघर्षला झोक्यातून बाहेर काढले आणि उपचारासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेले.संघर्षला वाचविण्यासाठी कुटुंबीयांनी तातडीने प्रयत्न केले. त्याला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर संघर्षला मृत घोषित केले. रविवारी वाढदिवस अन् सोमवारी अशाप्रकारे मृत्यू झाल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला. घटनेनं आईसह कुटुंबीय आणि नातेवाईकांनी रुग्णालयात हृदयद्रावक हंबरडा फोडला. या घटनेने रुग्णालय परिसरातही हळहळ व्यक्त करण्यात आली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >