Tuesday, September 1, 2026

Nashik Kumbhmela : नाशिक-त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार ! सिंहस्थ कुंभमेळ्यावर तब्बल ३५ हजार कोटींचा खर्च

Nashik Kumbhmela : नाशिक-त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार ! सिंहस्थ कुंभमेळ्यावर तब्बल ३५ हजार कोटींचा खर्च

Nashik Kumbhmela : हिंदू धर्मीयांच्या आस्थेशी जोडलेल्या कुंभमेळ्याने गतवर्षी प्रयागराजमध्ये गर्दीचे नवे विक्रम प्रस्थापित केले. आता २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा खर्चाच्या बाबतीत नवा विक्रम नोंदवणार आहे. मागील १२ वर्षांत देशात झालेल्या सहा कुंभमेळ्यांवर झालेल्या एकूण खर्चाच्या तुलनेत यंदाचा खर्च कित्येक पटीने अधिक असणार आहे. तब्बल ३५ हजार कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांनी नाशिक-त्र्यंबकेश्वरचा सिंहस्थ कुंभमेळा सजणार आहे. या निधीपैकी सर्वाधिक ५१ टक्के निधी रस्ते बांधणी आणि रस्ते विकासासाठी खर्च केला जाणार आहे. तर इमारती आणि संस्थात्मक पायाभूत सुविधांसाठी नऊ टक्के, पूल आणि उड्डाणपुलांसाठी आठ टक्के निधी खर्च होणार आहे.

कुंभमेळ्यात तब्बल १२ कोटी भाविक ?

२०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभात गर्दीचे आजवरचे अनेक विक्रम मोडीत निघाले. अपेक्षेपेक्षा तब्बल पाचपट भाविक या कुंभमेळ्यात सहभागी झाले होते. आता २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील कुंभमेळा होत असून, या सिंहस्थ कुंभमेळ्यात तब्बल १२ कोटी भाविक सहभागी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर नियोजन आणि जय्यत तयारी सुरू आहे. राज्य आणि केंद्र सरकार तसेच नाशिक महापालिकेकडून तब्बल ३५ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. धार्मिक परंपरा, आधुनिक तंत्रज्ञान आणि दीर्घकालीन पायाभूत सुविधांचा समन्वय साधत नाशिक-त्र्यंबकेश्वरला देशाची प्रमुख आध्यात्मिक राजधानी म्हणून विकसित करण्याची तयारी कुंभमेळा प्राधिकरणाने केली आहे.

कुंभमेळ्यात साधू-महंतांसह भाविकांची संख्या कोट्यवधींच्या घरात पोहोचते. त्यामुळे भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वतंत्र आर्थिक नियोजन करावे लागते. याच पार्श्वभूमीवर देशातील कुंभमेळ्यांच्या खर्चाची आकडेवारी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ चा आराखडा तयार करताना प्रशासनाने मांडली होती. त्यानुसार, २०१३ ते २०२५ या कालावधीत देशात सहा कुंभमेळे झाले. २०१३ मधील प्रयागराज कुंभमेळ्यासाठी शासनाने १ हजार १४२ कोटी रुपये, नाशिक-त्र्यंबकेश्वरमधील २०१५ च्या कुंभमेळ्यासाठी २ हजार ३७९ कोटी रुपये, उज्जैनमधील २०१६ च्या कुंभमेळ्यासाठी २ हजार ८१० कोटी रुपये, तर प्रयागराजमधील २०१९ च्या अर्धकुंभासाठी ३ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करण्यात आला. यानंतर हरिद्वारमधील २०२१ च्या कुंभमेळ्यासाठी १ हजार ५० कोटी रुपये, तर प्रयागराजमधील २०२५ च्या महाकुंभासाठी ७ हजार ३०३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, आता नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी यापेक्षा कित्येक पटीने मोठा खर्च होणार आहे.

कुंभमेळ्यावर तब्बल ३५ हजार कोटींचा खर्च

पुढील वर्षी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाच्या अखत्यारीतील प्राधिकरणाने २२ हजार ४२५ कोटी ३९ लाख रुपयांच्या योजनांना मान्यता दिली आहे. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २ हजार २७० कोटी ६० लाख रुपये, त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र विकासासाठी एमएसआयडीसीकडून २७५ कोटी रुपये, महापारेषणकडून ९४६ कोटी ८१ लाख रुपये, तर नाशिक जिल्हा परिषदेच्या ३५ कोटी ८ लाख रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडूनही ८ हजार ७६१ कोटी ५४ लाख रुपयांची कामे केली जात आहेत.

यामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची २ हजार ७६३ कोटी २४ लाख रुपयांची कामे, राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाची ४ हजार ३५५ कोटी ९२ लाख रुपयांची कामे, रेल्वेची १ हजार ३२९ कोटी २४ लाख रुपयांची कामे, रामकाल पथासाठी महापालिकेचे ९९ कोटी १४ लाख रुपये, तर एमएसआयडीसीच्या द्वारका चौकातील कामासाठी २१४ कोटी रुपयांचा समावेश आहे. अशाप्रकारे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आराखड्यात आतापर्यंत तब्बल ३४ हजार ७३२ कोटी ४२ लाख रुपयांच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. आता या एकूण निधीपैकी कोणत्या सुविधांवर किती खर्च होणार, हे पाहणंही महत्त्वाचं आहे.

स्त्यांसाठीच ५१ टक्के निधी

कुंभमेळ्यासाठी खर्च होणाऱ्या एकूण निधीपैकी तब्बल ५१ टक्के रक्कम केवळ रस्ते विकासासाठी वापरली जाणार आहे. देशभरातून येणाऱ्या साधू-महंतांच्या निवासासाठी उभारण्यात येणाऱ्या साधुग्रामसह तात्पुरत्या स्वरूपातील पायाभूत सुविधांसाठी १७ टक्के निधी खर्च केला जाणार आहे. इमारती आणि संस्थात्मक पायाभूत सुविधांसाठी नऊ टक्के, पूल आणि उड्डाणपुलांसाठी आठ टक्के, भाविकांसाठी वाहनतळ आणि वाहतूक व्यवस्थेसाठी सहा टक्के, विद्युत पायाभूत सुविधांसाठी तीन टक्के, पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी दोन टक्के, नवीन घाट बांधणी आणि नदीकाठावरील कामांसाठी दोन टक्के, तर सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस आणि अग्निशमन दलाच्या व्यवस्थेसाठी एक टक्का निधी खर्च होणार आहे.

पायाभूत सुविधांपैकी ८५ टक्के कामे कायमस्वरूपी

विशेष म्हणजे, कुंभमेळ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांपैकी तब्बल ८५ टक्के कामे कायमस्वरूपी स्वरूपाची असणार आहेत. तर उर्वरित १५ ते १६ टक्के कामे केवळ कुंभमेळ्याच्या कालावधीपुरती तात्पुरत्या स्वरूपाची असतील. रस्ते, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, घाट आणि इतर पायाभूत सुविधा कुंभमेळा संपल्यानंतरही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी उपयोगी ठरतील, असा दावा कुंभमेळा प्राधिकरणाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, २०१५ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यावेळी आर्थिक क्षमतेचे कारण देत निधीची व्यवस्था करण्यास नाशिक महापालिकेने असमर्थता दर्शविली होती. त्यामुळे त्यावेळी राज्य सरकारने महापालिकेचाही आर्थिक भार उचलला होता. मात्र, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेने तब्बल दोन ते तीन वर्षे आधीपासूनच तयारीला सुरुवात केली आहे.

महापालिकेचा कर्जभार  वाढला

२०२४-२५ या आर्थिक वर्षात २२५ कोटी रुपये आणि २०२५-२६ या आर्थिक वर्षात २०० कोटी रुपये, अशी एकूण ४२५ कोटी रुपयांची तरतूद महापालिकेच्या अंदाजपत्रकात करण्यात आली. याच काळात महापालिकेने ४०६ कोटी रुपयांच्या ठेवी मोडल्या. गोदावरी स्वच्छतेसाठी स्वच्छ गोदावरी आणि पाणीपुरवठा योजनेच्या विस्तारासाठी हरित म्युनिसिपल बाँडच्या माध्यमातून ४०० कोटी रुपये उभारण्यात आले. तसंच, खासगी-भागीदारी तत्त्वावरील ४४९ कोटी रुपयांच्या मलनिस्सारण प्रकल्पामुळे महापालिकेचा कर्जभार ८५० कोटी रुपयांनी वाढला आहे. एकूणच, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेने आतापर्यंत सुमारे १ हजार २०० ते १ हजार २५० कोटी रुपयांचा स्वनिधी उभारल्याचे सांगितले जाते. म्हणजेच, २०२७ चा नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार नाही, तर तब्बल ३५ हजार कोटी रुपयांच्या पायाभूत विकासामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या भविष्यातील विकासालाही मोठी दिशा देणारा ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >