Tuesday, September 1, 2026

Nashik : डेंग्यू-मलेरियाविरोधात मनपाचा पुन्हा ‘घराघरांत’ धडक मोर्चा

Nashik : डेंग्यू-मलेरियाविरोधात मनपाचा पुन्हा ‘घराघरांत’ धडक मोर्चा

Nashik : डेंग्यू, मलेरिया आणि स्वाइन फ्लूचा वाढता धोका लक्षात घेऊन नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना तीव्र केल्या आहेत. आयुक्त मनिषा खत्री (Municipal Commissioner Manisha Khatri) यांनी राजीव गांधी भवन येथे आरोग्य विभागाची तातडीची बैठक घेऊन उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यानंतर झाकीर हुसेन रुग्णालयाची पाहणी करून आरोग्य सुविधा, औषधसाठा व स्वाइन फ्लूसाठीच्या विलगीकरण व्यवस्थेची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. (Nashik News)

१० ते २० सप्टेंबरदरम्यान सर्वेक्षण मोहीम

ऑगस्टमध्ये सुमारे ३०० पथकांच्या माध्यमातून १ लाख ७१ हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. डासांची उत्पत्तीस्थाने शोधून साचलेले पाणी काढण्यात आले. आवश्यक ठिकाणी धूरफवारणी व औषध फवारणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करून आतापर्यंत सुमारे ५१ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या ऑगस्टमध्ये डेंग्यूची रुग्णनोंद सर्वात कमी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र, प्रादुर्भाव रोखण्यासाठी १० ते २० सप्टेंबरदरम्यान पुन्हा विशेष घराघरांत सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. (Nashik News)

स्वाइन फ्लूसाठी स्वतंत्र कक्ष

झाकीर हुसेन रुग्णालय आणि बिटको रुग्णालयात स्वाइन फ्लूसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. खासगी रुग्णालयात तपासणीनंतर स्वाइन फ्लूचा अहवाल सकारात्मक आलेल्या नागरिकांना आवश्यक औषधे मनपाच्या रुग्णालयांतून विनामूल्य दिली जात आहेत. दरम्यान या पाहणीवेळी प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत शेटे, प्रभारी सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर, निवासी डॉक्टर डॉ. शिल्पा काळे, डॉ. हरगीतसिंग कथुरिया तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश उपस्थित होते.मनपाच्या उपाययोजनांसोबत नागरिकांनीही घर व परिसरात पाणी साचू न देण्याचे, टायर्स, कंटेनर, कुंड्या व भांड्यांमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >