Tuesday, September 1, 2026

Nashik : देव तारी त्याला कोण मारी...७५ वर्षीय आजीची दोन दिवस अंधाऱ्या विहिरीत मृत्यूशी झुंज, दोन दिवसांनी सुखरूप बाहेर

Nashik : देव तारी त्याला कोण मारी...७५ वर्षीय आजीची दोन दिवस अंधाऱ्या विहिरीत मृत्यूशी झुंज, दोन दिवसांनी सुखरूप बाहेर

Nashik : देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय चांदवड शहरातील नागरिकांना आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ७५ वर्षीय आजीची दोन दिवस अंधाऱ्या विहिरीत मृत्यूशी झुंज यशस्वी ठरली आहे. 29 ऑगस्टपासून बेपत्ता असलेल्या चंद्रभागा धुळाजी व्हरकटे या आजी बसस्थानकाजवळील एका उघड्या विहिरीत पडल्या होत्या. तब्बल दोन दिवस अन्न-पाण्याविना काळोख्या विहिरीत अडकूनही त्यांनी मृत्यूशी झुंज देत स्वतःचा जीव वाचवला आहे. सध्या या घटनेची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरु आहे. (Nashik News)

नेमकं काय घडलं ?

ही घटना नाशिक जिल्ह्यातील चांदवड (Chandwad) येथे घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चांदवडच्या फुले नगर येथे राहणाऱ्या चंद्रभागा धुळाजी व्हरकटे या ७५ वर्षांच्या आजीबाई मुलाकडे जाण्यासाठी २९ ऑगस्ट रोजी घराबाहेर पडल्या होत्या. मात्र दोन दिवसांचा कालावधी उलटून देखील त्या काही घरी पोहचल्या नाही. त्यामुळे चिंताग्रस्त कुटूंबियांनी त्यांचा शोध घेण्यासाठी जीवाचं रान केलं, मात्र सगळीकडे शोध घेऊनही त्या काही सापडल्या नाहीत. दरम्यान, देव धावून यावा तसा गणेश पारवे हा तरुण याठिकाणी जणू आजीसाठी धावून आला. एसटी बस स्थानकाच्या विहिरी जवळून जात असताना त्याला आजीचा आवाज ऐकू आला अन् त्याने डोकावून पाहिले तर त्याला एक महिला पाण्याच्या पाईपला असलेल्या दोरीला पकडून असल्याचे दिसले.(Nashik News)

अन् नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला

त्याने तातडीने इतर नागरिकांना याबाबत माहिती दिल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर स्थानिक युवक, चांदवड पोलीस आणि नगरपरिषदेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. चंद्रभागा आजींना विहिरीतून बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. स्थानिक युवकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उतरून आजींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. अखेर खाटेच्या सहाय्याने त्यांना विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. दोन दिवसांच्या संघर्षानंतर आजींची सुखरूप सुटका होताच परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान, आजीला बाहेर काढून शासकीय रुग्णालय दाखल करण्यात आले असून आजीची प्रकृती ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (Nashik News)

काळ आला होता पण वेळ आली नव्हती

दोन दिवस आजी अन्न आणि पाण्याविना अंधारात विहिरीत पडून होत्या. मात्र त्यांनी धाडस करून पाईपला पकडून ठेवल्यामुळे त्यांचा जीव वाचला. त्या विहिरीकडे का गेल्या होत्या आणि कशा पडल्या याबाबत त्यांना काहीही आठवत नाही. चंद्रभागा आजी या विहिरीत नेमक्या कशा पडल्या, याचा तपास आता चांदवड पोलीस करत आहेत. दरम्यान, संबंधित उघड्या विहिरीत यापूर्वीही अपघात झाल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या विहिरीभोवती सुरक्षा जाळी आणि संरक्षक कठडे बसवावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान काळ आला होता पण वेळ आली नव्हती हेच या घटनेतून दिसून येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >