Wednesday, September 2, 2026

Nashik Crime : मनमाडमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १४ जण ताब्यात

Nashik Crime : मनमाडमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १४ जण ताब्यात

Nashik Crime : मनमाड शहरातील मध्यवर्ती भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मालेगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक संदीप गुंजाळ यांच्या विशेष पथकाने मध्यरात्री धडक कारवाई केली. मनमाडच्या गुरुद्वारामागे रात्री दीड वाजेच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात १४ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, १ लाख ९५ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक संदीप गुंजाळ यांच्या सह मनमाड शहर पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. (Nashik Crime News)

जुगार अड्ड्यावर छापा, १४ जण ताब्यात

मनमाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती अपर पोलीस अधीक्षक संदीप गुंजाळ यांना मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर विशेष पथकाने मनमाड शहर पोलिसांच्या (Manmad City Police) सहकार्याने कारवाईचे नियोजन केले. त्यानुसार मध्यरात्री संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच जुगार खेळणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. मात्र, पोलिसांनी परिसराला घेराव घालत १४ जणांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून जुगाराच्या व्यवहारातील १ लाख ९५ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. (Nashik Crime News)

१४ जणांविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणी विशेष पथकातील पोलीस कर्मचारी राम मिसाळ यांच्या फिर्यादीवरून ताब्यात घेतलेल्या १४ जणांविरोधात संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार झाल्टे करीत आहेत. मनमाड शहरात सण-उत्सवाच्या काळात मध्यरात्री झालेल्या या धडक कारवाईमुळे अवैध जुगार व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शहरातील इतर जुगार अड्यांवरही अशीच कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (Nashik Crime News)

प्रतिष्ठित व्यक्तींच्या सहभागाची चर्चा

दरम्यान, या जुगार प्रकरणात काही प्रतिष्ठित व्यक्तींचा सहभाग असल्याची चर्चा शहरात सुरू असून, जुगार अड्डा नेमका कोणाच्या आश्रयाने सुरू होता, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या कारवाईनंतर शहरातील इतर ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांकडून कधी कारवाई होणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >