Thursday, September 3, 2026

Jalgaon Crime : अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तनाचा आरोप, संतप्त जमावाने थेट शिक्षकाची कार पेटवली

Jalgaon Crime : अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तनाचा आरोप, संतप्त जमावाने थेट शिक्षकाची कार पेटवली

Jalgaon Crime : खासगी क्लासच्या शिक्षकाने अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन करून तिच्याकडे अयोग्य मागणी केल्याचा प्रकार बोदवड तालुक्यातील जामठी येथे समोर आला आहे. या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात (Bodwad Police Station) पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच संतप्त नागरिकांचा जमाव आक्रमक झाला. जमावाने संशयित शिक्षकाच्या घराकडे धाव घेत त्याची कार पेटवून दिली. यावेळी पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. त्यामुळे गावात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. संशयित शिक्षकाच्या घराजवळ मोठ्या संख्येने जमाव जमल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयित शिक्षकाला ताब्यात घेत पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाण्यात आणले. मात्र, संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही जमाव शांत झाला नाही. संशयित शिक्षकाला पोलिसांच्या ताब्यात न देता आपल्या ताब्यात द्यावे, अशी मागणी जमावातील काही नागरिकांनी केली. यावरून पोलिस आणि जमावामध्ये वाद निर्माण झाला.

जमावाकडून पोलिसांवर दगडफेक

संशयित शिक्षकाला ताब्यात घेऊन पोलीस पुढील कारवाईसाठी निघाले असताना जमावाने त्याला विरोध केला. यावेळी पोलीस आणि जमावामध्ये झटापट झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, काही वेळातच जमावातील व्यक्तींनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केल्याचे समोर आले. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. पोलिसांच्या कारवाईनंतर जमाव हळूहळू पांगला आणि परिस्थिती नियंत्रणात आली.

संतप्त जमावाने शिक्षकाची कार पेटवली

दरम्यान, संतप्त नागरिकांनी संशयित शिक्षकाच्या घराकडे धाव घेत त्याच्या कारला आग लावली. कार पेटवल्याने जामठी गावात मोठी खळबळ उडाली. घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील बंदोबस्त वाढवला असून, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनीही जामठी येथे घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडून संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली. गावातील शांतता कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

गावात शांतता, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनेनंतर जामठी गावात काही काळ तणावपूर्ण वातावरण होते. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर सध्या गावातील परिस्थिती शांत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. अल्पवयीन मुलीशी संबंधित प्रकरण असल्याने पोलिसांकडून तपासाची गोपनीयता राखली जात आहे. संशयित शिक्षकावरील आरोपांची सत्यता तपासाअंती स्पष्ट होणार आहे. दरम्यान, नागरिकांनी कायदा हातात न घेता पोलिसांना सहकार्य करावे आणि गावातील शांतता व सुव्यवस्था कायम ठेवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >