Thursday, September 3, 2026

Royal Enfield : रॉयल एनफिल्ड फक्त बाईकच नाही, तर टी-शर्टपासून बूटांपर्यंत सर्व काही विकते; जाणून घ्या किंमती आणि कंपनीची कहाणी

Royal Enfield : रॉयल एनफिल्ड फक्त बाईकच नाही, तर टी-शर्टपासून बूटांपर्यंत सर्व काही विकते; जाणून घ्या किंमती आणि कंपनीची कहाणी

मुंबई : रॉयल एनफिल्डच्या बाईक्स (Royal Enfield) त्यांच्या दमदार लूक आणि रॉयल अंदाजासाठी ओळखल्या जातात. मात्र, कंपनी केवळ बाईक्सची निर्मिती करत नाही, तर टी-शर्ट, कॅप, बॅग, शूज, जॅकेट, सनग्लासेस आणि इतर ॲक्सेसरीज देखील विकते. विशेष म्हणजे, यापैकी अनेक वस्तू बाईकच्या तुलनेत कमी किमतीत उपलब्ध आहेत. (Royal Enfield)

टी-शर्टची सुरुवात ₹६०० पासून

रॉयल एनफिल्डचे टी-शर्ट ₹६०० पासून उपलब्ध आहेत. सध्या सुरू असलेल्या सेलमध्ये ₹१,१०० किमतीचा टी-शर्ट ₹६६० मध्ये मिळत आहे. ओव्हरसाईज टी-शर्ट ₹१,०२२, पोलो टी-शर्ट ₹१,१५५ आणि फुल-स्लीव्ह टी-शर्ट ₹१,४६० पासून उपलब्ध आहेत.

शूज आणि बूट्सची किंमत ₹३,९९० पासून सुरू होते. लेदर बूट्स ₹४,३२० तर कारगिल बूट्स ₹४,४०० पासून उपलब्ध आहेत. लेदर जॅकेट्स मात्र महाग आहेत. पुरुषांच्या लेदर जॅकेटची किंमत सुमारे ₹१४,०००, तर महिलांच्या जॅकेटची किंमत ₹१७,००० आहे.

कंपनीच्या बॅग्सची किंमत ₹४,५०० ते ₹५,५०० दरम्यान आहे. सनग्लासेसची किंमत ₹५,९५० पर्यंत जाते. गोरखा कॅप ₹१,२९०, स्लिंग बॅग ₹१,२५० आणि पाण्याची बाटली ₹३२० मध्ये उपलब्ध आहे.

१९०१ मध्ये बनवली पहिली बाईक

रॉयल एनफिल्डने आपली पहिली बाईक १९०१ मध्ये तयार केली. त्यानंतर १९३२ मध्ये पहिल्यांदा Bullet मॉडेल बाजारात आणण्यात आले. स्वातंत्र्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर गस्त घालण्यासाठी भारतीय सैन्याला मजबूत बाईक्सची गरज होती. १९५२ ते १९५४ दरम्यान भारतीय सैन्याने ८०० Bullet 350cc बाईक्सची ऑर्डर दिली. भारतात बाईक्स असेंबल करण्यासाठी मद्रास मोटर्सने रेडडिच कंपनीसोबत भागीदारी करून Enfield Indiaची स्थापना केली. (Royal Enfield)

कंपनी बंद होण्याच्या मार्गावर होती

१९९०च्या दशकात स्वस्त बाईक्सच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे रॉयल एनफिल्डच्या विक्रीत घट झाली आणि कंपनी तोट्यात जाऊ लागली. १९९४ मध्ये आयशर मोटर्सने कंपनी विकत घेतली, मात्र त्यानंतरही काही काळ परिस्थिती सुधारली नाही. (Royal Enfield)

२००० नंतर कंपनी बंद करण्याचाही विचार झाला. मात्र २००९ मध्ये Classic 350 चे नवीन व्हर्जन लॉन्च केल्यानंतर रॉयल एनफिल्डने भारतीय बाजारात पुन्हा मजबूत पकड मिळवली.

मिड-साइज बाईक सेगमेंटमध्ये मोठा वाटा

आज भारतीय मिड-साइज मोटरसायकल सेगमेंटमध्ये रॉयल एनफिल्डचा ८५ ते ९० टक्के हिस्सा असल्याचा दावा केला जातो. आयशर मोटर्सच्या एकूण महसूल आणि नफ्यात रॉयल एनफिल्डचा वाटा सुमारे ८० ते ९० टक्के आहे.

२०२६-२७च्या पहिल्या तिमाहीत आयशर मोटर्सच्या महसुलात २१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. एप्रिल-जून तिमाहीत कंपनीला ₹१,४६३ कोटींचा नफा झाला. या तिमाहीत कंपनीने ३,३२,९४० बाईक्सची विक्री केली, जी मागील वर्षाच्या तुलनेत २७ टक्क्यांनी अधिक आहे. (Royal Enfield)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >