Friday, September 4, 2026

BMC News : बांधकामाचा अनधिकृत राडोराडा प्रकरणांत पाच महिन्यांत ३१.६४लाखांचा दंड वसूल; स्वच्छतेच्या नवीन उपविधीनुसार ५२५६ लोकांवर कारवाई

BMC News : बांधकामाचा अनधिकृत राडोराडा प्रकरणांत पाच महिन्यांत ३१.६४लाखांचा दंड वसूल; स्वच्छतेच्या नवीन उपविधीनुसार ५२५६ लोकांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत बांधकाम व पाडकाम कचऱ्याच्या अनधिकृत विल्हेवाटीमुळे रस्त्यांवरील धूळ, वायुप्रदूषण, नाले तुंबणे, सार्वजनिक जागांमध्ये अडथळे निर्माण होतात. तसेच पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांचे नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे महानगरपालिकेने अशाप्रकारच्या उल्लंघनांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मागील पाच महिन्यांमध्ये म्हणजे १ एप्रिल ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत बांधकाम व पाडकाम कचऱ्याशी संबंधित एकूण ४१९ प्रकरणांमध्ये कारवाई करून महापालिकेने तब्बल ३१ लाख ६४ हजार ४७६ एवढा इतका दंड वसूल केला आहे. या कारवाईचा उद्देश केवळ दंड वसूल करणे हा नसून नागरिक, आस्थापना, मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणारे घटक, कंत्राटदार आणि इतर संबंधितांमध्ये स्वच्छतेबाबत जबाबदारी निर्माण करणे हा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मुंबई महानगरपालिकेने १ एप्रिल २०२६ पासून मुंबईत नवीन घनकचरा व्यवस्थापन उपविधींची अंमलबजावणी सुरू केली आहे. शहरातील स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या विविध प्रकारच्या उल्लंघनांसाठी या उपविधींमध्ये दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, थुंकणे, उघड्यावर लघवी किंवा शौच करणे, सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण होईल अशा पद्धतीने प्राणी किंवा पक्ष्यांना खाद्य देणे, सार्वजनिक ठिकाणी वाहने किंवा भांडी धुणे, अंगण व परिसर स्वच्छ न ठेवणे, कचऱ्याचे वर्गीकरण न करणे, बांधकाम व पाडकामाचा कचरा अनधिकृत ठिकाणी टाकणे किंवा विनामंजुरी वाहतूक करणे, कचरा जाळणे, विक्रेते व फेरीवाल्यांकडून होणारे उल्लंघन, पाळीव प्राण्यांमुळे होणारी अस्वच्छता तसेच सार्वजनिक कार्यक्रमानंतर निर्धारित वेळेत परिसराची स्वच्छता न करणे अशा विविध बाबींचा यामध्ये समावेश आहे.

नवीन उपविधीनुसार केलेल्या कारवाईत ५२५६ लोकांवर कारवाई

मागील १ एप्रिल ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत महानगरपालिकेने नवीन उपविधींनुसार एकूण ५,२५६ प्रकरणांमध्ये कारवाई करून ९० लाख २२ हजार ६२६ रुपये इतका दंड आकारला. केवळ ऑगस्ट २०२६ या महिन्यात १,२५० प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आणि २० लाख १९ हजार ५३१ एवढा दंड आकारण्यात आला. ऑगस्टमधील आकडेवारीवरून शहरभर अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यात आल्याचे तसेच कचरा वर्गीकरण, परिसर स्वच्छता आणि अधिकृत पद्धतीने कचरा विल्हेवाट लावण्यासंदर्भात नियमांचे पालन सुनिश्चित करण्यावर भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे.

अंगण आणि लगतचा परिसर स्वच्छ

ऑगस्ट महिन्यात अंगण आणि लगतचा परिसर स्वच्छ न ठेवल्याच्या एकूण ४९२ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. यामध्ये मालक किंवा रहिवाशांविरुद्ध २५१ प्रकरणे आणि इतर व्यक्तींविरुद्ध २४१ प्रकरणांचा समावेश आहे. या दोन्ही प्रकारच्या उल्लंघनांसाठी एकूण ८लाख १४ हजार ९०० इतका दंड आकारण्यात आला. रस्ते, गल्ल्या, पदपथ, उद्याने आणि इतर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याबद्दल ऑगस्टमध्ये ३२८ प्रकरणे नोंदवून १ लाख ७४ हजार ७०० एवढा दंड आकारण्यात आला. वैयक्तिक नागरिक आणि मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांकडून वर्गीकरण न केलेला कचरा दिल्याबद्दल १२२ प्रकरणांमध्ये कारवाई करून ५२,९०० दंड आकारण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

बांधकाम व पाडकाम कचऱ्याच्या अनधिकृत विल्हेवाटीमुळे रस्त्यांवरील धूळ, वायुप्रदूषण, नाले तुंबणे, सार्वजनिक जागांमध्ये अडथळे निर्माण होणे आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांचे नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे महानगरपालिकेने या उल्लंघनांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. १ एप्रिल ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत बांधकाम व पाडकाम कचऱ्याशी संबंधित एकूण ४१९ प्रकरणांमध्ये कारवाई करून ३१लाख ६४ हजार ४७६ इतका दंड आकारण्यात आला. अनधिकृत किंवा निश्चित न केलेल्या ठिकाणी बांधकाम व पाडकाम कचरा टाकल्याच्या ३४९ प्रकरणांमध्ये २० लाख ७५ हजार ६५१ दंड आकारण्यात आला. मंजूर आराखडा किंवा परवानगीशिवाय अशा कचऱ्याची वाहतूक केल्याच्या ७० प्रकरणांमध्ये १० लाख ८८ हजार ८२५ दंड आकारण्यात आला. केवळ ऑगस्ट महिन्यात बांधकाम व पाडकाम कचऱ्याशी संबंधित ६५ प्रकरणांमध्ये ८ लाख ५३ हजार ६८१ इतका दंड आकारण्यात आला. यामध्ये अनधिकृत ठिकाणी कचरा टाकल्याच्या २६ प्रकरणांमध्ये ४ लाख ३० हजार ८५६ आणि मंजूर आराखड्याशिवाय कचऱ्याची वाहतूक केल्याच्या ३९ प्रकरणांमध्ये ४ लाख २२ हजार ८२५ इतका दंड आकारण्यात आला.

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त किरण दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता उपविधीसह स्वच्छ आंगण परिसरत तसेच बांधकामाचा राडारोडा हटवण्याची कार्यवाही जोरात सुरु आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार,या कारवाईचा उद्देश केवळ दंड वसूल करणे हा नसून नागरिक, आस्थापना, मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणारे घटक, कंत्राटदार आणि इतर संबंधितांमध्ये स्वच्छतेबाबत जबाबदारी निर्माण करणे हा आहे. नागरिकांनी कचऱ्याचे उगमस्थानी वर्गीकरण करावे, आपले अंगण आणि लगतचा परिसर स्वच्छ ठेवावा तसेच प्रत्येक प्रकारचा कचरा केवळ महानगरपालिकेने निर्धारित केलेल्या अधिकृत संकलन, वाहतूक आणि विल्हेवाट व्यवस्थेमार्फतच सुपूर्द करावा, असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >