Sunday, September 6, 2026

Mahatma Gandhi Biopic : गांधीजींच्या भूमिकेसाठी जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन करणारा हा अभिनेता आहे तरी कोण...? फर्स्ट लूक भलताच चर्चेत!

Mahatma Gandhi Biopic : गांधीजींच्या भूमिकेसाठी जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन करणारा हा अभिनेता आहे तरी कोण...? फर्स्ट लूक भलताच चर्चेत!

मुंबई : असंख्य ऐतिहासिक व्यक्तिरेखा अशा आहेत, ज्या पडद्यावर साकारण्याचं स्वप्न अनेक कलाकार पाहतात. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांच्या भूमिका साकारण्यासाठी कलाकारांना मोठी तयारी करावी लागते. अशातच बॉलिवूडमधून एक रंजक बातमी समोर आली आहे. आपल्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकणारा दिग्गज अभिनेता मनोज वाजपेयी लवकरच महात्मा गांधींच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

मनोज वाजपेयींचा गांधीजींच्या रूपातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो समोर आल्यानंतर सुरुवातीला नेटकऱ्यांनाही हा अभिनेता नेमका कोण आहे, हे ओळखणं कठीण झालं. मात्र, हा दुसरा-तिसरा कोणी नसून मनोज वाजपेयी असल्याचं समोर आलं आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महानायक महात्मा गांधींची व्यक्तिरेखा मनोज वाजपेयी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर साकारणार आहे. त्याच्या फर्स्ट लूकने सोशल मीडिया आणि सिनेसृष्टीत चांगलीच उत्सुकता निर्माण केली आहे.

थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन; मनोज वाजपेयीला ओळखणंही कठीण

‘हजारों ख्वाहिशें ऐसी’, ‘धारावी’ आणि ‘चमेली’ यांसारख्या वास्तववादी चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांच्या आगामी चित्रपटात मनोज वाजपेयी महात्मा गांधींची भूमिका साकारणार आहेत. समोर आलेल्या फर्स्ट लूकमध्ये मनोज वाजपेयीचा जबरदस्त मेकओव्हर पाहायला मिळत आहे. बारीक शरीरयष्टी, पांढरीशुभ्र खादीची शाल, गांधीजींचा प्रसिद्ध गोल चष्मा आणि हातात काठी अशा लूकमध्ये ते हुबेहूब गांधीजींच्या रूपात दिसत आहे. या व्यक्तिरेखेसाठी मनोजने घेतलेली मेहनत त्याच्या लूकमधून स्पष्टपणे जाणवते.

फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्या या ट्रान्सफॉर्मेशनचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. गांधीजींच्या भूमिकेत मनोज वाजपेयी नेमका कसा प्रभाव पाडेल, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे.

गांधीजींच्या आयुष्यातील 'ते' २१ दिवस पडद्यावर

विशेष म्हणजे, हा चित्रपट महात्मा गांधींच्या संपूर्ण आयुष्यावर आधारित बायोपिक नसणार आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील इतिहासाच्या पानांमध्ये फारशी चर्चा न झालेल्या २१ दिवसांच्या एका महत्त्वपूर्ण कालखंडावर या चित्रपटाची कथा आधारित आहे.

या काळात नेमकं काय घडलं होतं? गांधीजींनी कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले होते? आणि या घडामोडींचा देशाच्या भवितव्यावर काय परिणाम झाला? या सगळ्याचा उलगडा चित्रपटातून करण्यात येणार आहे. मनोज वाजपेयीसोबतच ज्येष्ठ अभिनेते सौरभ शुक्लादेखील या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक विषयावरील चित्रपटाकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >