Monday, September 7, 2026

Ahilynagar News : शासकीय अनुदान वाटपात गैरप्रकाराचा आरोप, तब्बल ६ महिन्यांपासून फरार महिला तलाठ्याला अखेर अटक

Ahilynagar News : शासकीय अनुदान वाटपात गैरप्रकाराचा आरोप, तब्बल ६ महिन्यांपासून फरार महिला तलाठ्याला अखेर अटक

Ahilynagar News : आपत्तीग्रस्त आणि पात्र लाभार्थ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मदत व सानुग्रह अनुदानाच्या वाटपात नियमांचे उल्लंघन करून शासकीय निधीचे नुकसान केल्याच्या आरोपाने राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तब्बल सहा महिन्यांपासून फरार असलेल्या महिला तलाठ्यास अखेर राहुरी पोलिसांनी अटक केली आहे. मंगल रूपचंद दुशिंगे (Mangal Rupchand Dushinge) असे अटक करण्यात आलेल्या महिला तलाठ्याचे नाव आहे. माहेगाव येथे ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत असताना सन २०२२ ते २०२३ या कालावधीत मदत व पुनर्वसन विभागाच्या अनुदान वाटपात नियमांचे पालन न करता ३ लाख ६५ हजार ३४० रुपयांचे अनुदान वितरित केल्याचे चौकशी अहवालातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

चौकशी समितीच्या अहवालातून अनियमितता समोर

मंगल दुशिंगे माहेगाव येथे ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत असताना मदत आणि सानुग्रह अनुदानाच्या वाटपात अनियमितता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली. समितीने केलेल्या चौकशीत सन २०२२ ते २०२३ या कालावधीत ३ लाख ६५ हजार ३४० रुपयांचे अनुदान नियमबाह्य पद्धतीने वितरित केल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले.

चौकशी अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आणि तत्कालीन तहसीलदारांनी गुन्हा दाखल करण्यासाठी प्राधिकृत केल्यानंतर मंडल अधिकारी विजय बबनराव बेरड यांच्या फिर्यादीवरून एप्रिल २०२६ मध्ये राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगल दुशिंगे पोलिसांच्या हाती लागत नव्हत्या. त्यांचा तब्बल सहा महिन्यांपासून शोध सुरू होता.

अखेर ५ सप्टेंबरला पोलिसांसमोर हजर

सहा महिन्यांपासून फरार असलेल्या मंगल दुशिंगे अखेर ५ सप्टेंबर २०२६ रोजी राहुरी पोलिसांसमोर हजर झाल्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अटक केली. या अटकेमुळे शासकीय अनुदानाच्या कथित गैरप्रकाराच्या तपासाला वेग आला आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.

जालन्यात १२ लाखांच्या कथित अपहाराचीही चौकशी

दरम्यान, तपासादरम्यान मंगल दुशिंगे यांनी जालना जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने १२ लाख २४ हजार ८०२ रुपयांच्या शासकीय निधीचा कथित अपहार केल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे राहुरीतील प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जालन्यातील कथित प्रकरणातील संगनमत आणि आर्थिक व्यवहारांच्या अनुषंगानेही पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव आणि पोलीस नाईक गणेश लिपणे करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >