Monday, September 7, 2026

Anil Kapoor : सलमान खानच्या ‘बिग बॉस’ला अनिल कपूर देणार टक्कर! १०० स्पर्धक भिडणार, २६ कोटींसाठी रंगणार बुद्धीची लढाई

Anil Kapoor : सलमान खानच्या ‘बिग बॉस’ला अनिल कपूर देणार टक्कर! १०० स्पर्धक भिडणार, २६ कोटींसाठी रंगणार बुद्धीची लढाई

मुंबई : सध्या छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस २०’ची जोरदार चर्चा सुरू आहे. सलमान खानच्या होस्टिंगमुळे या रिॲलिटी शोने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असतानाच, आता बॉलिवूडचा आणखी एक दिग्गज अभिनेता छोट्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेता अनिल कपूर लवकरच एका नव्या रिॲलिटी गेम शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

अनिल कपूर होस्ट करणार असलेल्या ‘India Ke Top 1% - The Anil Kapoor Show’ या नव्या रिॲलिटी गेम शोचा पहिला टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टीझर समोर येताच सोशल मीडियावर या शोची जोरदार चर्चा सुरू झाली असून, अनिल कपूर यांचा हटके अंदाज प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

‘बिग बॉस २०’ची रंगत सुरू असतानाच आता अनिल कपूर यांच्या नव्या शोची भर पडल्याने छोट्या पडद्यावर दोन दिग्गज सुपरस्टार्सची चुरस पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा नवा गेम शो नेमका कसा असणार आणि अनिल कपूर आपल्या होस्टिंगने प्रेक्षकांचे किती मनोरंजन करणार, याची उत्सुकता वाढली आहे.

स्टार प्लस चॅनेलने आपल्या सोशल मीडिया हँडलवर या शोचा धमाकेदार प्रोमो रिलीज केला आहे. या शोचे स्वरूप कोणत्याही सामान्य क्वीझ गेमसारखे नसून, देशातील सर्वात हुशार लोकांच्या बुद्धीमत्तेचा कस लागणार आहे. या गेम शोमध्ये एकाच वेळी स्टेजवर १०० खेळाडू आमनेसामने उभे ठाकणार असून विजेत्याला तब्बल २६ कोटी रुपयांची मोठी बक्षीस रक्कम मिळणार आहे.

अनिल कपूरचं ना संपणारं स्टारडम...

चार दशकांहून अधिक काळ बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या अनिल कपूर यांचा उत्साह आजही भन्नाट आहे. यापूर्वी त्यांनी 'बिग बॉस ओटीटी सीझन ३' चे सूत्रसंचालन करून रिॲलिटी विश्वात आपली एक वेगळी छाप पाडली होती. आता पुन्हा एकदा त्यांचा तोच झक्कास अंदाज, या शोमधून पाहायला मिळणार आहे. प्रोमोमध्ये त्यांचा जबरदस्त वावर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, हा शो टीआरपीमध्ये कोणते स्थान मिळवणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

कधी आणि कुठे पाहता येणार शो?

'इंडिया के टॉप १%' या शोचा ग्रँड प्रीमियर येत्या १९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता स्टार प्लसवर पार पडणार आहे. टेलिव्हिजनसोबतच हा शो जिओ हॉटस्टारवर प्रेक्षकांसाठी २४ तास उपलब्ध असणार आहे. सलमानच्या 'बिग बॉस'ला हा शो नक्कीच तगडी टक्कर देणार असल्याचं म्हटलं जातंय.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >