Monday, September 7, 2026

पुन्हा फ्रिजकांड ! बोटं छाटली, डोकं फ्रिजमध्ये ठेवलं.... फ्रिजमधून दुर्गंधीचा वास अन् उलगडला हत्येचा थरार; पतीच निघाला आरोपी

पुन्हा फ्रिजकांड ! बोटं छाटली, डोकं फ्रिजमध्ये ठेवलं.... फ्रिजमधून दुर्गंधीचा वास अन् उलगडला हत्येचा थरार; पतीच निघाला आरोपी

Crime News : गुवाहाटीच्या (Guwahati) हाटीगाव परिसरात पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येनंतर मृतदेह लपवून आरोपी पती घरातून पसार झाला. मात्र, काही काळानंतर आरोपीने स्वतःहून हाटीगाव पोलीस ठाण्यात (Hatigaon Police Station) शरणागती पत्करली. पोलिसांनी त्याला अटक केली असून, हत्येमागील कारणाचा तपास सुरू आहे. रिया तालुकदार गोस्वामी (वय २५) असे मृत विवाहितेचे नाव असून, तिच्या हत्येप्रकरणी पती रामानुजन गोस्वामी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Guwahati Crime News)

फ्लॅटमधून दुर्गंधी आल्यानंतर प्रकार उघडकीस

ही घटना हाटीगावमधील बसिष्ठपूर बायलेन परिसरातील एका फ्लॅटमध्ये घडली. घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात रियाची हत्या झाल्याचे समोर आले. तिच्या मृतदेहासोबत गंभीर स्वरूपाचा छेडछाड केल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर आतमधील दृश्य पाहून त्यांनाही धक्का बसला. तिथे शीर नसलेला महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेच्या हाताची बोटही छाटल्याचे दिसून आले. पोलिसांनी मृतदेहाचे शीर शोधल्यानंतर ते घरातील फ्रिजमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून ठेवल्याचे आढळून आले.घटनास्थळावरून पोलिसांनी एक धारदार शस्त्र आणि मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. फ्लॅटमध्ये रक्ताचे डाग आढळले असून, घरातील वस्तूही अस्ताव्यस्त स्थितीत असल्याचे तपासात समोर आले. (Guwahati Crime News)

फॉरेन्सिक पथकाकडून तपास

अपार्टमेंटची फॉरेन्सिक आणि फिंगरप्रिंट पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले जात असून, हत्येपूर्वी आणि त्यानंतर नेमका काय घटनाक्रम घडला, याचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक अंदाजानुसार, मृतदेह सापडण्याच्या २४ ते ४८ तास आधी हत्या झाली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी गुवाहाटी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडूनही केला जात आहे. (Guwahati Crime News)

सहा महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

रिया आणि रामानुजन यांचे सुमारे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. दोघेही याच फ्लॅटमध्ये एकत्र राहत होते. रामानुजन हा मूळचा गौरीपूरचा असून, तो ‘उबर’ चालक म्हणून काम करत असल्याची माहिती आहे. संबंधित अपार्टमेंट त्याच्या वडिलांच्या मालकीच्या जमिनीवर बांधण्यात आले होते. मृत रिया ही नूनमती परिसरातील रहिवासी होती. ती फॅन्सी बाजारातील एसी मार्केट परिसरातील एका बुटीकमध्ये काम करत होती. रिया हिचे आई-वडील हयात नसून, तिचा एक भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. (Guwahati Crime News)

हत्येमागचं कारण अद्याप गुलदस्त्यात

आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे. मात्र, रिया हिची हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांची तपासणी केली जात असून, हत्येमागील कारण आणि संपूर्ण घटनाक्रमाचा उलगडा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >