Monday, September 7, 2026

Nashik : कुंभमेळ्याच्या तयारीत भोंदू साधूंचा सुळसुळाट ! मिठाई व्यावसायिकाला संमोहित करून सोन्याची अंगठी लंपास

Nashik : कुंभमेळ्याच्या तयारीत भोंदू साधूंचा सुळसुळाट ! मिठाई व्यावसायिकाला संमोहित करून सोन्याची अंगठी लंपास

Nashik : दर बारा वर्षानी भरणारा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळा यंदा न भूतो न भविष्यती करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून 34 हजार कोटी रुपये कुंभमेळ्यावर खर्च करण्यात येत आहेत. अशातच आता पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त यावर्षी असणार आहे. तसेच दरवेळी चोरट्यांचा देखील सुळसुळाट यंदाच्या कुंभमेळाव्यात पहायला मिळू शकतो. अशातच कुंभमेळाव्याच्या आधीच बोगस नागा साधूचा धक्कादायक प्रकार पहायला मिळाला आहे. ओझर परिसरात एका मिठाई व्यावसायिकाला संमोहित करून त्याच्या हातातील सोन्याची अंगठी लंपास करणाऱ्या दोन कथित बोगस नागा साधूंना ओझर पोलिसांनी मध्य प्रदेशातून ताब्यात घेतले आहे. (Nashik News)

भंडारा-पूजेच्या नावाखाली दुकानात प्रवेश

मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर येथे भंडारा आणि पूजेच्या नावाखाली दक्षिणा मागण्यासाठी एक साधू ओझरमधील मिठाईच्या दुकानात पोहोचला. यावेळी गल्ल्यावर बसलेल्या दुकानदाराच्या हातातील सोन्याची अंगठी त्याच्या नजरेस पडली. यानंतर हातचलाखी आणि संमोहनाचा वापर करत दुकानदाराच्या नकळत ही अंगठी काढून घेण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. (Nashik News)

घटना लक्षात आल्यानंतर दुकानदाराने ओझर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग देत परिसरातील तब्बल ४० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांचा माग काढत पोलिसांचे पथक मध्य प्रदेशातील खरगोन परिसरात पोहोचले. अखेर तेथून दोन कथित बोगस साधूंना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणाचा पुढील तपास ओझर पोलीस करत असून, या टोळीच्या इतर साथीदारांचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे. (Nashik News)

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे आवाहन

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये देशभरातून मोठ्या संख्येने भाविक आणि साधू-संत दाखल होणार आहेत. त्यामुळे या काळात भोंदू साधू किंवा संशयास्पद व्यक्तींकडून फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. दरम्यान, २०२६ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून या सोहळ्यासाठी सुमारे ३४ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. (Nashik News)

३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात होणार असून, हा भव्य सोहळा पुढील १८ महिने चालणार आहे. या कालावधीत ३ मुख्य शाही स्नान आणि ४२ पर्व स्नान होणार आहेत. मुख्य शाही स्नान जुलै ते सप्टेंबरदरम्यान पार पडणार आहेत.मोठ्या प्रमाणावर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता प्रशासन आणि पोलिसांकडूनही कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. अशातच ओझरमधील बोगस साधूंच्या प्रकरणामुळे कुंभमेळ्याच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >