Dhule Crime : धुळ्यात महावितरणच्या अधिकाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये आणखी एका घटनेची भर पडली आहे. शहरातील जिनगर गल्ली परिसरात शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयीन सहाय्यकाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात (Azadnagar Police Station) दोघा भावंडांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे महावितरणच्या कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांचा मुद्दा चर्चेत असतानाच, दुसरीकडे शिरपूर तालुक्यात महावितरणच्या विशेष तपासणी मोहिमेत मोठ्या प्रमाणात वीजचोरी उघडकीस आली आहे. (Dhule Crime News)
- राष्ट्रवादीची मागणी; मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर उपस्थित केले सवाल मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने मुंबई, ठाणे ...
होळ, पिलोद आणि होळनांथे परिसरात कारवाई
शिरपूर तालुक्यातील होळ, पिलोद आणि होळनांथे येथे महावितरणच्या पथकाने राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेत अनेक ठिकाणी वीज चोरी उघडकीस आली. यासंदर्भात महावितरणचे कनिष्ठ अभियंता योगेश आनंदा खैरनार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अधिकृत सर्विस वायरला कट मारून बायपास जोडणीद्वारे अनधिकृतपणे वीज वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले. विविध कारवायांमध्ये संबंधितांवर चोरीच्या विजेच्या वापरानुसार बिल, तडजोड शुल्क व दंड आकारण्यात आला.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत काही ठिकाणी अनेक महिन्यांपासून बायपास जोडणीच्या माध्यमातून वीज वापर सुरू असल्याचे समोर आले. त्यामुळे महावितरणला महसुलाचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. संबंधितांकडून चोरीच्या विजेचे बिल व दंडाची वसुली करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. होळ, पिलोद आणि होळनांथे येथील अनेक ग्राहकांनी अधिकृत जोडणीला बायपास करून घरातील विद्युत उपकरणे चालवल्याचे आढळले. या सर्व प्रकरणांमध्ये संबंधितांविरुद्ध वीज चोरीचे गुन्हे नोंदविण्यात आले असून ते पुढील तपासासाठी थाळनेर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहेत. महावितरणने नागरिकांना अनधिकृत वीज वापर टाळण्याचे तसेच कायदेशीर वीज जोडणीचाच वापर करण्याचे आवाहन केले आहे. (Dhule Crime News)
- जागतिक 'ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६' चे करणार उद्घाटन मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मंगळवारी (दि. ८ सप्टेंबर) एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर येत असून, ...
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
दरम्यान, धुळ्यातील महावितरण कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वीज थकबाकी वसुली, अनधिकृत जोडण्या तोडणे आणि तपासणी मोहिमेदरम्यान महावितरणच्या कर्मचाऱ्यांना अनेकदा विरोधाला सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. महावितरणनेही नागरिकांना अनधिकृत पद्धतीने वीज वापर न करण्याचे आणि केवळ अधिकृत वीज जोडणीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.