Monday, September 7, 2026

Thane Fire : ठाण्यात राजतारा सोसायटीतील फ्लॅटला आग; ४५ रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढले

Thane Fire : ठाण्यात राजतारा सोसायटीतील फ्लॅटला आग; ४५ रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढले

ठाणे : ठाणे पश्चिमेतील लुईसवाडी परिसरात सोमवारी सकाळी निवासी इमारतीतील एका फ्लॅटला आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. राजतारा सोसायटीच्या ‘ए’ विंगमधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीतील सुमारे ४० ते ४५ रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. सुदैवाने, या घटनेत जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे कोणतेही अधिकृत वृत्त नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे ८.४८ वाजण्याच्या सुमारास लुईसवाडीतील राजतारा सोसायटीमध्ये फ्लॅटला आग लागल्याची माहिती आपत्कालीन यंत्रणांना मिळाली. आग लागलेल्या फ्लॅटमधील दोन्ही रहिवासी वेळीच बाहेर पडण्यात यशस्वी झाले. त्यानंतर अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने इमारतीतील इतर रहिवाशांना खबरदारी म्हणून सुरक्षित ठिकाणी हलवले.

घटनेची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दलाचे बचाव वाहन, अग्निशमन गाडी आणि पाण्याचा टँकर घटनास्थळी दाखल झाला. प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथकही घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संबंधित वीज आणि इतर यंत्रणांचीही मदत घेण्यात आली.

आगीमुळे संबंधित फ्लॅटमधील घरगुती वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रेफ्रिजरेटर, वॉटर फिल्टर, लाकडी देवघर, कपाट, स्वयंपाकघरातील साहित्य, कपडे आणि विद्युत तारा यांसह अनेक वस्तू आगीत जळून खाक झाल्याची माहिती आहे. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दल आणि संबंधित अधिकारी घटनेचा तपास करत असून आग नेमकी कशामुळे लागली, याचा शोध घेतला जात आहे. मात्र तातडीच्या बचावकार्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून इमारतीतील डझनावधी रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >