Monday, September 7, 2026

Egypt Air Show : इजिप्तच्या आकाशात भारताचा ‘सारंग’ थरार! ‘डॉल्फिन लीप’सह नव्या कसरतीने जगाचे लक्ष वेधणार

Egypt Air Show : इजिप्तच्या आकाशात भारताचा ‘सारंग’ थरार! ‘डॉल्फिन लीप’सह नव्या कसरतीने जगाचे लक्ष वेधणार

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेच्या शौर्याची आणि स्वदेशी एरोस्पेस क्षमतेची झलक आता इजिप्तच्या आकाशात पाहायला मिळणार आहे. भारतीय वायुसेनेची प्रसिद्ध ‘सारंग’ हेलिकॉप्टर एरोबॅटिक टीम दुसऱ्या ‘एल अलामीन इंटरनॅशनल एअर शो’मध्ये सहभागी होण्यासाठी इजिप्तमध्ये दाखल झाली आहे. ८ ते १० सप्टेंबर २०२६ दरम्यान एल अलामीन इंटरनॅशनल एअरपोर्टवर हा आंतरराष्ट्रीय एअर शो आयोजित करण्यात आला आहे. या शोमध्ये सारंग टीम आपल्या थरारक हवाई कसरती सादर करणार आहे.(Egypt Air Show)

सारंग टीमच्या प्रात्यक्षिकांमध्ये यावेळी विशेष आकर्षण ठरणार आहे ते तिच्या प्रसिद्ध ‘डॉल्फिन लीप’ या कसरतीचे. याशिवाय टीमकडून ‘स्पॉट स्टॉल टर्न’ ही नवीन हवाई कसरतही सादर केली जाणार आहे. अचूक फॉर्मेशन, अत्यंत कमी अंतरावरून केले जाणारे उड्डाण आणि एकाच वेळी होणाऱ्या समन्वयित हालचालींमुळे सारंग टीमची प्रात्यक्षिके जगभरात विशेष आकर्षणाचे केंद्र ठरतात.(Egypt Air Show)

भारतीय वायुसेनेच्या या टीमची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे ती स्वदेशी बनावटीच्या ALH ध्रुव (Advanced Light Helicopter) हेलिकॉप्टरवर हवाई प्रात्यक्षिके सादर करते. अधिकृत माहितीनुसार, पाच हेलिकॉप्टरच्या साहाय्याने हवाई प्रात्यक्षिके सादर करणारी सारंग ही जगातील एकमेव पाच-हेलिकॉप्टर डिस्प्ले टीम आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक हवाई कसरतीत वैमानिकांचे कौशल्य, अचूकता, शिस्त आणि टीमवर्क यांची कसोटी लागते.(Egypt Air Show)

एल अलामीन एअर शोमध्ये जगभरातील हवाई दलांचे प्रतिनिधी तसेच एरोस्पेस क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. त्यामुळे सारंग टीमचा सहभाग हा केवळ हवाई प्रात्यक्षिकांपुरता मर्यादित नसून भारताच्या स्वदेशी एरोस्पेस उद्योगाच्या क्षमतेचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन करण्याची महत्त्वाची संधी मानली जात आहे.

या सहभागामुळे भारत आणि इजिप्तमधील संरक्षण सहकार्यालाही नवी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. भारतीय वायुसेनेच्या कौशल्यासोबतच ‘मेड इन इंडिया’ तंत्रज्ञानाची क्षमता जगासमोर मांडण्याचे काम सारंग टीम करणार आहे.

आता ८ सप्टेंबरपासून इजिप्तच्या आकाशात ‘डॉल्फिन लीप’ आणि ‘स्पॉट स्टॉल टर्न’चा थरार पाहायला मिळणार असून, सारंग टीमच्या या नेत्रदीपक प्रात्यक्षिकांकडे आंतरराष्ट्रीय एरोस्पेस क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >