Monday, September 7, 2026

Nashik Crime : सद्दाम शेख यांच्यावर खंडणीच्या गुन्ह्यांची ‘हॅट्‌ट्रिक’ ,महागड्या बीएमडब्ल्यूतून येत उकळले सव्वादोन लाख

Nashik Crime : सद्दाम शेख यांच्यावर खंडणीच्या गुन्ह्यांची ‘हॅट्‌ट्रिक’ ,महागड्या बीएमडब्ल्यूतून येत उकळले सव्वादोन लाख

Nashik Crime : ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याचे धमकावत पंधरा कोटीच्या खंडणीची मागणी करून ओझर, आडगाव शिवारात पाच कोटीची जमिनीवर बळजबरीने कब्जा करण्यासह मेडिकल व्यावसायिकाकडूनही खंडणी उकळणारा भूमाफिया सद्दाम बाबू शेख (रा. अमृतधाम, पंचवटी, नाशिक) यांसह त्याच्या दोघा साथीदारांविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात (Bhadrakali Police Station) आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित सद्दाम याच्या विरोधात शहर पोलिसांत खंडणीचा हा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

तक्रारदार फिर्यादी गणेश महेश झाल्टे (वय ३९, रा. साईनगर, अमृतधाम, नाशिक) हे व्यवसायाने ब्रोकर व चालक असून, रविवारी (दि. ६) सायंकाळी सहाच्या सुमारास द्वारका परिसरातील ट्रॅक्टर हाऊसकडून गोदाघाटावरील रामकुंडाकडे निघाले होते. संशयित खंडणीखोर सद्दाम शेख व त्याच्या सोबत असलेले दोन अनोळखी साथीदार तसेच ‘मामू’ नामक इसम अशा तिघांनी झाल्टे यांचे वाहन अडवले.

'हप्ता दे नाही तर तुझा इथेच गेम करू'

सद्दाम शेख याने आपल्याकडील धारदार चाकू झाल्टे यांना लावून, ‘‘आमच्या गँगला दरमहा २० हजार रुपये हप्ता द्यावा लागेल. नाही तर तुझा इथेच गेम करून टाकू’’ असे धमकावत झाल्टे यांच्याकडून एक लाख २० हजार रुपयांची खंडणी उकळली. यासाठी सद्दामसह तिघा संशयितांनी फिर्यादी यांना दोन तास थांबवून ठेवले. तसेच मामू या इसमामार्फत दि. २२ डिसेंबर २००३ चे साठेखत मागवून त्यावर चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने साठेखतावर साक्षीदार म्हणून फिर्यादीच्या वडिलांचे नाव टाकण्यास माग पाडून त्यावर तक्रारदार झाल्टे यांना स्वाक्षरी करण्यास भाग पाडले.

शिवीगाळ - मारहाण अन् कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

त्यानंतर, फिर्यादी झाल्टे यांनी हप्ता देण्याचे बंद केल्यानंतर संतापलेल्या सद्दाम याने त्याच्याकडील महागड्या बीएमडब्ल्यू चारचाकीतून येत खडकाळी सिग्नल येथे फिर्यादीस पकडून बळजबरीने वाहनात बसण्यास भाग पाडले. तसेच झाल्टे यांच्या पोटाला चाकू लावून शिवीगाळ व मारहाण करून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याचे धमकावले. जबरदस्तीने एक लाख रुपयांची खंडणी उकळली. अशाप्रकारे एकूण दोन लाख २० हजार रुपये सद्दाम आणि त्याच्या साथीदारांनी झाल्टे यांच्याकडून खंडणी उकळली.

याप्रकरणी झाल्टे यांच्या फिर्यादीवरून संशयित सद्दाम व त्याचे दोघे साथीदार आणि मामू नामक इसमाविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात (Bhadrakali Police Station) गु. र. नं. ३५९/ २०२६ भा. न्या. सं. कलम ३०८ (२), (३), (५) अन्वये खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिरसाठ पुढील तपास करीत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >