Tuesday, September 8, 2026

Kanpur Murder Case : करोडपती सुनेनेच रचला सासऱ्याच्या हत्येचा कट ! ‘तो’ मेसेज अन् फोन कॉल्समुळे सुनेचा भांडाफोड

Kanpur Murder Case : करोडपती सुनेनेच रचला सासऱ्याच्या हत्येचा कट ! ‘तो’ मेसेज अन् फोन कॉल्समुळे सुनेचा भांडाफोड

Kanpur Murder Case : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये रतन ऑर्बिट परिसरात झालेल्या विनीत मिनोच हत्याकांडाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. या प्रकरणात शालू नावाच्या ३० वर्षीय सुनेवर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. सासऱ्याकडून खर्चासाठी कमी पैसे मिळत होते, घरात अनेक बंधनं होती, बाहेर जाणं आणि पार्ट्यांना जाण्यावरही आक्षेप घेतला जायचा, तसेच सातत्याने टोमणे मारले जात होते, असा दावा शालूने पोलिसांसमोर केल्याची माहिती समोर आली आहे. म्हणूनच तिने सासऱ्याचा काटा काढण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. या हत्याकांडात विशाल गौतम आणि राज किशोर या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पहिला प्लॅन फसला त्यानंतर

पोलिसांच्या माहितीनुसार, जन्माष्टमीच्या दिवशीच विनीत मिनोच यांच्या हत्येचा पहिला प्लॅन आखण्यात आला होता. शालूने शिवम नाव सांगून एका व्यक्तीला घरात प्रवेश दिला. गेटवरील सुरक्षा रक्षकाला नोंद करण्यासही मनाई करण्यात आली. मात्र त्या दिवशी हत्या करण्याचा प्लॅन फसला. त्यानंतर शनिवारी पुन्हा हत्येचा कट रचण्यात आला. शालू तिच्या पती आणि मुलांसोबत पार्टीला गेली. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांनी विशाल गौतम आणि राज किशोर बनावट चावी घेऊन घरात दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये विशाल दरवाजाचं कुलूप उघडण्याचा प्रयत्न करताना दिसत असल्याची माहिती आहे. पहिल्या प्रयत्नात चावीने कुलूप न उघडल्याने त्याने पुन्हा प्रयत्न केला. यानंतर घरात घुसून विनीत मिनोच यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.

हत्येनंतर आरोपींच्या हाताला, तोंडाला आणि कपड्यांवर रक्त लागलं होतं. दोघांनी हात-पाय धुतले आणि त्यानंतर खाली आले. मात्र मुख्य दरवाजातून बाहेर पडण्याऐवजी त्यांनी शेजारच्या पार्कमधून भिंतीवरून उडी मारत पलायन केलं. कपड्यांवरील रक्ताचे डाग पाहून पकडले जाऊ, या भीतीने मुख्य दरवाजा टाळल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिल्याचं सांगितलं जात आहे.

१२ फोन कॉल्सने वाढवला पोलिसांचा संशय

या संपूर्ण प्रकरणात शालू आणि विशाल गौतम यांच्यातील फोन कॉल्सही पोलिसांसाठी महत्त्वाचा धागा ठरल्याची माहिती आहे. हत्येच्या दिवशी दुपारी १२ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत दोघांमध्ये तब्बल १२ वेळा फोनवरून संपर्क झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे, हे कॉल फार मोठे नव्हते. प्रत्येक कॉल साधारण एक ते दीड मिनिटांचा असल्याची माहिती आहे. यामध्ये नियमित कॉल्ससोबत व्हॉट्सॲप कॉल्सचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.

‘आम्ही निघत आहोत’... या मेसेजने उघड केलं गूढ

पोलिसांना विशालच्या मोबाईलमध्ये एक मेसेज मिळाल्याची माहिती आहे. ‘आम्ही निघत आहोत’ असा हा मेसेज असल्याचं सांगितलं जात आहे. याच मेसेजमुळे पोलिसांचा शालूवरील संशय अधिक बळावला आणि त्यानंतर तपासाची दिशा बदलली. फोन कॉल्स, मेसेज, सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींच्या चौकशीतून कानपूरमधील या हायप्रोफाईल हत्याकांडाचा उलगडा झाल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे. मात्र या प्रकरणातील कट नेमका कसा रचला गेला, हत्येपूर्वी कोणकोणत्या गोष्टी ठरवण्यात आल्या आणि या कटामागे आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >