Nashik Crime : नाशिकच्या देवळा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील लाचखोरीच्या प्रकरणात तब्बल १२ वर्षांनंतर न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. शेतगटाच्या एकत्रीकरण योजनेतील नकाशातील चुकीची नोंद दुरुस्त करून प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलेल्या उपअधीक्षक सुरेश वेताळ याला न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. जिल्हा आणि सत्र न्यायालयाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार वेताळला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. (Nashik Crime News)
नकाशातील चूक दुरुस्त करण्यासाठी मागितली लाच
तक्रारदाराच्या चिंचवे येथील शेतगटाच्या एकत्रीकरण योजनेच्या नकाशामध्ये चुकीची नोंद झाली होती. ही नोंद दुरुस्त करून मूळ प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यासाठी देवळा भूमी अभिलेख कार्यालयातील तत्कालीन उपअधीक्षक सुरेश वेताळ याने तक्रारदाराकडे ४ हजार रुपयांची लाच मागितली. पंचांसमक्ष लाचेची मागणी केल्यानंतर तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. (Nashik Crime News)
मुंबई : ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 च्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलात होणाऱ्या या ...
कार्यालयातच लाच घेताना सापळा
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. भूमी अभिलेख कार्यालयातील दालनात तक्रारदाराकडून ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सुरेश वेताळला रंगेहात पकडण्यात आलं. या प्रकरणी ३० मार्च २०१२ रोजी देवळा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पूर्ण झाल्यानंतर १४ मार्च २०१४ रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. (Nashik Crime News)
कोर्टाने ठोठावली तीन वर्षांची शिक्षा
या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. कथोरे यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने सुरेश वेताळला भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ अंतर्गत दोन वर्षांचा कारावास आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसंच कलम १३(२) अंतर्गत तीन वर्षांचा कारावास आणि तीन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता विजय गायकवाड आणि शिरीष कडवे यांनी काम पाहिलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
Action taken in software source code theft case : पुण्यातील आयटी कंपनीच्या सॉफ्टवेअरचा सोर्स कोड चोरी केल्याच्या प्रकरणात अहिल्यानगर सायबर पोलिसांनी (Ahilyanagar Cyber Police) मोठी कारवाई ...
लाच मागितल्यास ACBशी संपर्क साधण्याचं आवाहन
दरम्यान, कोणत्याही शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्ती लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा १०६४ हा टोल फ्री क्रमांक असून, नाशिक कार्यालयाशी ०२५३-२५७५६२८, ०२५३-२५७८२३० या क्रमांकांवर किंवा ९५४५६५१०६४ या WhatsApp क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.




