Infrastructure Projects : रस्ते, रेल्वे, सागरी मार्ग, बंदरांसाठी पर्यायी वनीकरणाची जमीन शोधण्याची चिंता मिटणार; राज्यात दरवर्षी ५ हजार हेक्टर पर्यायी वनीकरणाची गरज

पायाभूत प्रकल्पांसाठी ४० हजार हेक्टरची ‘लँड बँक’


मुंबई : पायाभूत विकास प्रकल्पांसाठी वनजमीन वळतीकरणाची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी राज्य सरकारने पर्यायी वनीकरणासाठी सुमारे ४० हजार ६०२ हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे. वन विभागाने तयार केलेल्या ‘लँड बँक’मध्ये ३३ हजार ५६ हेक्टर अवनत वनजमीन, तर महसूल विभागाकडे ७ हजार ५४६ हेक्टर वनेतर जमीन उपलब्ध असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महामार्ग, रेल्वे, बुलेट ट्रेन, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, सागरी मार्ग, बंदरे आणि विद्युत वाहिन्यांसारख्या प्रकल्पांसाठी पर्यायी वनीकरणाची जमीन शोधण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि गतिमान होणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिली.


महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रापैकी सुमारे २० टक्के क्षेत्र वनाच्छादित असल्याने मोठ्या पायाभूत प्रकल्पांसाठी वनजमिनीचा प्रश्न अनेकदा महत्त्वाचा ठरतो. एखादा प्रकल्प वनजमिनीशिवाय किंवा पर्यायी मार्गाने उभारता येऊ शकतो का, याची तांत्रिक, अभियांत्रिकी आणि संरचनात्मक तपासणी प्रथम केली जाते. पर्यायी मार्ग व्यवहार्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच वनजमिनीमधून प्रकल्पाचे संरेखन निश्चित केले जाते. त्यातही आवश्यक तेवढ्याच किमान वनजमिनीचा वापर करून वनक्षेत्रावरील परिणाम कमी ठेवण्याची भूमिका प्रस्तावात मांडण्यात आली आहे. वनजमीन वळतीकरणासाठी ‘वन (संरक्षण आणि संवर्धन) अधिनियम, १९८०’ अंतर्गत केंद्राची पूर्वपरवानगी आवश्यक असते. या प्रक्रियेत पर्यायी वनीकरणासाठी योग्य वनेतर जमीन उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. काही विशिष्ट प्रकल्पांना वनेतर जमीन उपलब्ध करून देण्यापासून सूट असली तरी अशा प्रकरणांत वळतीकरण होणाऱ्या वनजमिनीच्या क्षेत्राच्या दुप्पट क्षेत्रावरील अवनत वनजमिनीवर प्रकल्प यंत्रणेच्या खर्चातून पर्यायी वनीकरण करण्याची तरतूद असल्याचे प्रस्तावात नमूद आहे.


पर्यायी वनीकरणासाठी जमीन उपलब्ध करून देणे हीच या प्रक्रियेतील मोठी अडचण आहे. राज्यात दरवर्षी सरासरी २ हजार ते ३ हजार हेक्टर अवनत वनजमिनीवर आणि १ हजार ते २ हजार हेक्टर वनेतर जमिनीवर पर्यायी वनीकरणाची गरज भासते. मात्र योग्य जमीन शोधणे, तिची उपलब्धता निश्चित करणे आणि संबंधित शासकीय किंवा निमशासकीय विभागाकडून ती वन विभागाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया वेळखाऊ ठरते. त्यामुळे वनजमीन वळतीकरणाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यास विलंब होतो. ही अडचण कमी करण्यासाठी जिल्हानिहाय ‘लँड बँक’ तयार करण्यात आली आहे.



विदर्भात सर्वाधिक अवनत वनजमीन



  • या लँड बँकमध्ये विभागनिहाय मोठी तफावत दिसून येते. नाशिक विभागात ९ हजार २ हेक्टर, नागपूर विभागात ८ हजार १०९ हेक्टर, पुणे विभागात ५ हजार ३३० हेक्टर, अमरावती विभागात ५ हजार ७२४ हेक्टर आणि छत्रपती संभाजीनगर विभागात ४ हजार १७९ हेक्टर अवनत वनजमीन उपलब्ध आहे. कोकण विभागात हे प्रमाण ७१२ हेक्टर असून, मुंबई शहर व मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे या लँड बँकेत अवनत वनजमीन उपलब्ध नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

  • जिल्हानिहाय विचार करता चंद्रपूरमध्ये ३ हजार ८२८ हेक्टर, यवतमाळमध्ये ३ हजार ७९९ हेक्टर, धुळ्यात २ हजार ७८३ हेक्टर, जळगावमध्ये २ हजार १४२ हेक्टर, सोलापूरमध्ये २ हजार १५० हेक्टर आणि नांदेडमध्ये २ हजार ३१ हेक्टर अवनत वनजमीन उपलब्ध असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.

  • पर्यायी वनीकरणासाठी महसूल विभागाकडील ७ हजार ५४६ हेक्टर वनेतर जमीनही लँड बँकेत समाविष्ट करण्यात आली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाकडे २ हजार ६८९ हेक्टर, नाशिककडे २ हजार ५२५ हेक्टर, अमरावतीकडे १ हजार १५३ हेक्टर, पुण्याकडे ६४० हेक्टर, कोकणकडे ४०८ हेक्टर, तर नागपूर विभागाकडे १३१ हेक्टर जमीन उपलब्ध आहे.



फायदा काय होणार?


या जमिनीची निवड करताना ती अतिक्रमणमुक्त असणे, कोणत्याही प्रकारच्या अधिभार, बोजा किंवा दाव्याखाली नसणे तसेच भौगोलिक, तांत्रिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या पर्यायी वनीकरणासाठी योग्य असणे आवश्यक आहे. सर्व बाबींची खातरजमा झाल्यानंतरच जमीन स्वीकारली जाणार आहे. वनेतर जमीन वन विभागाकडे हस्तांतरित केल्यानंतर भारतीय वन अधिनियम, १९२७ मधील तरतुदीनुसार ती ‘राखीव वन’ म्हणून घोषित केली जाईल आणि राज्याच्या एकूण वनक्षेत्रात तिचा समावेश होणार आहे. लँड बँकमुळे प्रकल्प यंत्रणांना पर्यायी वनीकरणासाठी उपलब्ध जमिनीची माहिती सहज मिळणार आहे. अवनत वनजमिनींसाठी संबंधित वन अधिकाऱ्यांकडे, तर वनेतर जमिनीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करता येतील. त्यामुळे जमीन उपलब्ध करण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गतिमान होऊन वनजमीन वळतीकरणाच्या प्रस्तावांना मंजुरी मिळण्यास लागणारा वेळ कमी होईल, असा वन विभागाचा दावा आहे. परिणामी पायाभूत प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील विलंब कमी होण्याबरोबरच पर्यायी वनीकरणाचे नियोजनबद्ध काम आणि दर्जेदार रोपवनांच्या निर्मितीलाही चालना मिळेल. अवनत वनजमिनीची लँड बँक आणि वनेतर जमिनीची लँड बँक स्वतंत्र संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्याचेही प्रस्तावित आहे. विकास प्रकल्पांसाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देताना वनक्षेत्राची हानी भरून काढणे आणि पर्यावरणीय समतोल राखणे, या दोन्ही बाबी साध्य करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Chandrakant Patil : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेशी संबंधित दुर्मिळ दस्तऐवजांचा नवीन खंड २० ऑक्टोबर रोजी होणार प्रकाशित

Mumbai : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे घेतलेल्या ऐतिहासिक बौद्ध धम्मदीक्षेशी संबंधित दुर्मिळ

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर; १३ आणि १४ सप्टेंबरला विविध कार्यक्रम

एशियाटिक सोसायटी, हिंदी राजभाषा संमेलनाला उपस्थित राहणार मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) १३ आणि १४

DevendraFadnavis : एजेंटिक एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय क्षेत्रात नवे परिवर्तन घडविण्याची संधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

मुंबई : डिजिटल वित्तीय क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक,

Anna Bansode : पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वास्तूंची जतन-संवर्धन कामे दर्जेदार करावीत; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले निर्देश

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई’ अंतर्गत शाळा,

Ganeshotsav 2026: Mira Bhayandar गणेशमूर्ती विसर्जनासाठी सज्ज, २४ ठिकाणी तलावांचा समावेश; वाचा यादी

मीरा भाईंदर: मीरा भाईंदर महानगर पालिकेकडून गणेशोत्सवाच्या आधीपासूनच गणेशमूर्ती विसर्जनाच्या उपाययोजना

Pratap Sarnaik : चालकांना कल्याणकारी मंडळाचे सदस्यत्व; ॲपआधारित टॅक्सी चालकांची संपूर्ण माहिती तीन महिन्यांत सादर करा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : ‘महाराष्ट्र ॲग्रीगेटर धोरण २०२६’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ॲपआधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या