Wednesday, September 9, 2026

Nashik News : येवल्यात 760 कोटींचा मेगा प्रोजेक्ट ! 4 हजार रोजगारांची संधी

Nashik News : येवल्यात 760 कोटींचा मेगा प्रोजेक्ट ! 4 हजार रोजगारांची संधी

Nashik News : नाशिकच्या येवल्यात आता उद्योगविश्वासाठी मोठी बातमी आहे. कारण येवल्यात तब्बल ७६० कोटी रुपयांचा कृषी-आधारित अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. सुखजित स्टार्च अँड केमिकल्स लिमिटेडकडून हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, या उद्योगात दररोज तब्बल १ हजार २०० मेट्रिक टन मक्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असणार आहे. या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात सुखजित बायोकॉर्न आणि उद्योग विभागामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

प्रकल्प १२ ते १५ महिन्यांत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट

या प्रकल्पासाठी कंपनीने शासनाकडे काही महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची मागणी केली आहे. यामध्ये सुमारे १५० एकर जमीन, दररोज ५ एमएलडी प्रक्रिया पाणी, ६ मेगावॅट वीज जोडणी आणि रस्ते जोडणीचा समावेश आहे. विशेष म्हणजे, उद्योग विभागाकडून या प्रकल्पाचा मेगा प्रकल्पामध्ये समावेश करण्याबाबत कंपनीला ऑफर लेटरही देण्यात आलं आहे. कंपनीच्या नियोजनानुसार हा प्रकल्प १२ ते १५ महिन्यांत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे.

4 हजार रोजगारांची संधी

सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकल्पामुळे सुमारे १ हजार प्रत्यक्ष आणि तब्बल ३ हजार अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येवल्यातील या प्रकल्पामुळे नाशिकच्या कृषी उत्पादनाला अन्नप्रक्रिया उद्योगाची जोड मिळणार असून, शेतकरी, स्थानिक उद्योग आणि रोजगाराला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. म्हणजेच, ७६० कोटींची गुंतवणूक आणि हजारो रोजगार येवल्याच्या औद्योगिक विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

येवला औद्योगिक वसाहत परिसरात सुखजित स्टार्च अँड केमिकल्स लिमिटेडच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण उद्योग उभा राहत आहे. या संदर्भातील करार करताना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, उद्योग मंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, माजी खासदार समीर भुजबळ, सुखजित बायोकॉर्न लिमिटेडचे उपाध्यक्ष आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >