Nashik News : महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या म्युनिसिपल हायस्कूलमध्ये शिक्षण विभागाची चौकशी समिती तपासणीसाठी आली असताना ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक सोपान खंडेराव बोरसे (५२, रा. वझिरखेडे, मालेगाव) यांची प्रकृती अचानक बिघडून त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी ही घटना घडली.
नेमकं काय घडलं ?
मंगळवारी सकाळी अकरावी-बारावीच्या परीक्षा सुरू असताना नाशिक पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटोळे यांच्यासह चार अधिकाऱ्यांचं पथक शाळेत चौकशीसाठी दाखल झालं होतं. यावेळी परीक्षा सोडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं, शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांकडून शिक्षकांशी अरेरावीची वागणूक देण्यात आली. याचदरम्यान वर्गात परीक्षा घेत असलेल्या प्राध्यापक सोपान बोरसे यांना तातडीने कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं. बोरसे कार्यालयात पथकासमोर पोहोचले आणि काही वेळातच अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते कार्यालयातच कोसळले. उपस्थित शिक्षकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं.
Pune Crime : पोलिसांना चकवा देण्यासाठी वेशभूषा बदलली, सोशल मीडियापासूनही स्वतःला दूर ठेवलं, तब्बल चार महिने पोलिसांच्या हातावर तुरी देत फिरत राहिला पण अखेर ...
‘चौकशीच्या मानसिक त्रासामुळे मृत्यू’चा आरोप
दरम्यान, प्राध्यापक बोरसे यांचा मृत्यू हा चौकशीच्या नावाखाली दिल्या जाणाऱ्या मानसिक त्रासामुळे झाल्याचा गंभीर आरोप शिक्षक आणि प्राध्यापक संघटनांनी केला आहे. शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, या शाळेची यापूर्वीही चौकशी करण्यात आली होती. चौकशीसाठी आवश्यक कागदपत्रं अधिकाऱ्यांना देण्यात आली होती आणि शिक्षकांकडूनही सहकार्य करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतरही वारंवार चौकशी पथक पाठवून शिक्षकांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला. विशेष म्हणजे, प्राध्यापक बोरसे यांची यापूर्वी चार वेळा चौकशी झाली होती, असा दावा शिक्षकांनी केला आहे.
शिक्षकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या
या घटनेनंतर संतप्त शिक्षक, प्राध्यापक आणि सेवकांनी शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं. प्राध्यापक बोरसे यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्राही शिक्षकांनी घेतला होता. यानंतर अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांची भेट घेतली. या घटनेची सखोल चौकशी करून दोष आढळल्यास गुन्हा दाखल केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिल्यानंतर शिक्षकांनी आपलं आंदोलन मागे घेतलं.
दरम्यान, प्राध्यापक बोरसे यांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण काय? चौकशीदरम्यान नेमकं काय घडलं? आणि अधिकाऱ्यांवर करण्यात येणाऱ्या आरोपांमध्ये तथ्य आहे का? याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे. एका प्राध्यापकाचा चौकशीदरम्यान अचानक मृत्यू झाल्याने या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.





