मालाडमध्ये अपुरा व गढूळ पाण्यावरून नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाणी कपात रद्द करण्याची सदस्यांची मागणी
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक विभागांमध्ये सध्या कमी दाबाने पाणी पुरवठा आणि गढुळ पाणी पुरवठ्याने नगरसेवक त्रस्त झाले असून याचे तीव्र पडसाद मंगळवारी महापालिका सभागृहात उमटले. मालाड पूर्व भागांतील कुरार व्हिलेजमध्ये अपुरा आणि गढूळ पाण्याचा पुरवठा होत असून याचे निवारण करण्यात जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने स्थानिक नगरसेवकाने पी उत्तर प्रभाग कार्यालयाबाहेर हंडा घेवून ठिय्या मारला. याला सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी पाठिंबा देत ठिय्या मारला. यावरून निर्माण झालेल्या पाण्याच्या मुद्दयावरून महापालिका सभागृहात सुरु झालेल्या चर्चेत संपूर्ण मुंबईतील भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी चिंता व्यक्त करत दहा टक्के पाणीकपात मागे घेण्यात यावी अशी मागणी केली. तर पाण्यासाठी वॉटर कमिटी गठीत करण्याची सूचना सदस्यांनी करत सभागृह नेत्यांचेही न ऐकणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. (Mumbai Water Cut)
बाह्यरूग्ण विभागातील नोंदणीसाठी रूग्ण व नातेवाईकांना घेता येईल प्रायोगिक तत्वावर यूपीआयची सेवा मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : लोकमान्य टिळक ...
मुंबई महापालिका सभागृहात पी पूर्व व पी उत्तर प्रभाग समितीचे अध्यक्ष अजित रावराणे यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे पी पूर्व विभागातील मालाड पूर्व मधील कुरार व्हिलेजमधील पाणी समस्येवर लक्ष वेधून घेतले. मागील चार महिन्यांपासून पाण्याचा पुरवठा योग्य रितीने होत नाही. तसेच जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांना कल्पना देवूनही ते काही सोडवत नाही. त्यामुळे मागील प्रभाग समितीत दिलेल्या इशाऱ्यानुसार मंगळवारी झालेल्या प्रभाग समिती बैठकीच्या दिवशी मी हंडा घेवून कार्यालयाबाहेर ठि्य्या मारला. त्यानंतर याची कल्पना माझ्या सहकारी नगरसेवकांनी उपायुक्त तसेच सहायक आयुक्तांना देवूनही त्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे सर्व पक्षीय नगरसेवकांनी मला पाठिंबा देत ठिय्या मारला. त्यानंतर स्वत: सभागृहनेते तिथे माझ्यासोबत ठिय्या मारुन बसले. त्यानंतरही उपायुक्त व सहायक आयुक्त भेटण्यास खाली आले नाही. आज कारखान्यांना पाणी मिळते पण लोकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे जनता त्रस्त असून त्यामुळे हा पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर तेजिंदर तिवाना, प्रकाश दरेकर, संगीता शर्मा, सिध्दार्थ शर्मा आदींनी दहा टक्के पाणीकपात रद्द करून याबाबत संयुक्त बैठक घेवून याचे निवारण केले जावे. तसेच नगरसेवकांना अशी वागणूक अधिकारी का देता असा सवाल करतानाच टँकर माफियांच्या मुद्दयावरही चिंता व्यक्त केली. त्यावर सभागृहनेते गणेश खणकर यांनी निवडून दिलेल्या नगरसेवकाला अशी वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांना त्वरीत बोलावून घ्यावे. आणि अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तसेच पाणी प्रश्न सुटत नाही तोवर एकही नगरसेवक प्रभाग समितीच्या बैठकीला जाणार नाही. (Water Crisis)
यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ सईदा खान यांनी पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी वॉटर कमिटी बनवण्याची मागणी केली. गोराई भागातील पाणी समस्येवर शिवानंद शेट्टी यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले,तर सभागृहनेत्यांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी श्वेता कोरगावकर, निशा परुळेकर रिटा मकवाना, बाळा तावडे आदींनी केली. यावेळी झालेल्या चर्चेत योगेश वर्मा, अंजली वर्मा, योगिता कोळी, लिना देहेरकर, आकाश पुरोहित, ममता यादव यांच्यासह उमेश माने, समृध्दी काते, अंजली सामंत आदींनी चर्चेत भाग घेतला. (Water Problem)
आयुक्तांसोबतच्य बैठकीत घेणार कारवाईचा निर्णय
सभागृहाचे काम संपल्यानंतर उपमहापौरांच्या उपस्थित संबंधित अधिकारी, सभागृहनेते तसेच मालाडमधील नगरसेवक आणि अतिरिक्त् आयुक्त यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आयुक्त मुंबईच्या बाहेर असल्याने त्या मुंबई परतल्यानंतर याबाबतच्या कारवाईचा निर्णय घेतला जाईल असे ठरले गेले. त्यामुळे आता कारवाईची कुऱ्हाड कुणाच्या खांद्यावर मारली जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे. (BMC)