Thursday, September 10, 2026

Khajiri Che Bol Marathi Movie : हातात खंजिरी, मनात राष्ट्रभक्ती; राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची गाथा आता रुपेरी पडद्यावर!

Khajiri Che Bol Marathi Movie : हातात खंजिरी, मनात राष्ट्रभक्ती; राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची गाथा आता रुपेरी पडद्यावर!

मुंबई : सध्या मराठी चित्रपटसृष्टीत अध्यात्म, संतपरंपरा आणि महान व्यक्तिमत्त्वांच्या जीवनावर आधारित चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळताना दिसत आहे. संतांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्याला रुपेरी पडद्यावर मांडणाऱ्या कलाकृतींकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले जात आहे. नुकताच नीम करौली बाबा यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत चर्चेचा विषय ठरला. संत आणि समाजसुधारकांच्या विचारांची समृद्ध परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, संत जनाबाई यांसारख्या अनेक संतांचा मोठा वारसा आहे.

या संतपरंपरेने केवळ भक्तीचा मार्ग दाखवला नाही, तर समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी आणि अन्यायाविरोधातही आवाज उठवला. मानवता, सामाजिक जागृती आणि राष्ट्रनिर्मितीचा विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचे मोठे कार्य त्यांनी केले. आता याच परंपरेतील एका प्रभावी समाजसुधारक संताचा प्रेरणादायी जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

हातात खंजिरी घेऊन आपल्या प्रभावी कीर्तनातून जनजागृती करणारे आणि समाजाला राष्ट्रनिर्मितीची दिशा देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘खंजिरीचे बोल’ हा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा, विचारांचा आणि जनजागृतीच्या लढ्याचा प्रवास या चित्रपटातून उलगडणार असून, तुकडोजी महाराजांच्या कार्याची नवी ओळख रुपेरी पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार हे केवळ ईश्वराची आराधना करणारे नव्हते, तर त्यामध्ये समाजप्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामविकास आणि ज्वलंत राष्ट्रभक्तीचा संगम पाहायला मिळायचा. "मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव्ह" किंवा "तुझे सगुण रूप ध्यावे" अशा अनेक भजनांच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी आणि खेड्यापाड्यातील माणसाला जगण्याचे तत्त्वज्ञान शिकवले. हातातल्या साध्या खंजिरीवर थाप मारत त्यांनी स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवली आणि अंधश्रद्धेच्या विळख्यातून समाजाला बाहेर काढले. हाच अंगावर शहारे आणणारा इतिहास आता मोठ्या पडद्यावर मांडणार आहे.

'खंजिरीचे बोल' या चित्रपटाची घोषणा होताच सर्वांची उत्सुकता या गोष्टीकडे लागली होती की, महाराजांचे रूप पडद्यावर कोण जिवंत करणार? अखेर चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले असून, मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

‘खंजिरीचे बोल’च्या पोस्टरमधून अभिनेता प्रसाद ओकचा तुकडोजी महाराजांच्या व्यक्तिरेखेतील लूक समोर आला असून, त्याची देहबोली, चेहऱ्यावरील भाव आणि एकूणच व्यक्तिमत्त्व महाराजांची हुबेहूब आठवण करून देत आहे. हा लूक पाहून प्रेक्षकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. प्रसाद ओकने याआधीही विविध ऐतिहासिक आणि आव्हानात्मक व्यक्तिरेखा ताकदीने साकारल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भूमिका त्याच्या अभिनयातून किती प्रभावीपणे उभी राहते, याची उत्सुकता आता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >