Nashik News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून भोंदूबाबांकडून नागरिकांची फसवणूक केल्याची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. अशोक खरातच्या प्रकरणाने नाशिक जिल्हा आधीच हादरला असताना यात अनेक नव्या भोंदू बाबांची भर पडली आहे. नाशिकमध्ये पुन्हा नव्या भोंदूबाबाचा प्रताप उघड झाला आहे. १५ कोटी रुपयांचा पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी भोंदूबाबासह सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. कळवण तालुक्यातील पिंपळे खुर्द येथे ही कारवाई करण्यात आली. मुंबईतील काही कुटुंबांना मंत्र-तंत्र आणि पूजा विधीच्या नावाखाली फसवल्याचा आरोपींवर आरोप आहे.
१५ कोटींचा पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष
मिळालेल्या माहितीनुसार, भोंदूबाबाने पीडित कुटुंबीयांना १५ कोटी रुपयांचा पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवलं. विश्वास संपादन करण्यासाठी त्याने एक हजार रुपये घेऊन त्याचे दोन लाख रुपये केल्याचा बनाव रचल्याचा आरोप आहे. या कथित चमत्कारामुळे पीडितांचा त्याच्यावर विश्वास बसला. त्यानंतर पूजा विधीच्या वेळी नारळातून स्फोट घडवून आणत चमत्कार केल्याचा बनावही करण्यात आला. भोंदूबाबाच्या या कथित चमत्कारांना भुलून पाच जणांनी त्याला तब्बल १० लाख ५५ हजार रुपये दिल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर आरोपीने तीन कोटी रुपयांचा पैशांचा पाऊस पाडल्याचा दावा करत गोणीभर नोटा पीडितांना दिल्या. मात्र, या गोणी सात दिवसांपर्यंत उघडू नका, अशी भीतीही त्यांना दाखवण्यात आली.
गुजरात : मुलांसाठी आई-वडील कोणत्याही थराला जाऊ शकतात, याचा प्रत्यय देणारी एक भावूक आणि फिल्मी वाटावी अशी घटना गुजरातमधून समोर आली आहे. दोन ...
गोणी उघडताच फसवणूक उघडकीस
सात दिवसांनंतर पीडितांनी गोण्या उघडल्या असता त्यांना मोठा धक्का बसला. बंडलच्या वरच्या बाजूला असलेली नोट खरी होती; मात्र त्यानंतरच्या बहुतांश नोटा बनावट असल्याचं समोर आलं.आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पीडितांनी आरोपींकडे पैसे परत मागितले. मात्र, पैसे परत देण्याऐवजी त्यांना जीवे मारण्याची आणि गायब करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
अंनिसच्या मदतीने पोलिसांत तक्रार
यानंतर पीडितांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी (अंनिस) संपर्क साधला. अंनिसच्या मदतीने अभोणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करत भोंदूबाबा हिराचंद बर्डे याच्यासह सहा जणांना अटक केली. या प्रकरणात आरोपींविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, अशाच प्रकारे मंत्र-तंत्र, चमत्कार किंवा पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी अभोणा पोलिसांशी किंवा अंनिसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या या टोळीच्या आणखी कोणत्या कारवाया समोर येतात, याकडे आता पोलिसांच्या तपासाचं लक्ष लागलं आहे.