Friday, September 11, 2026

Borkheda Murder Case : बोरखेडा पंचायतीच्या सरपंचाच्या पतीची निर्घृण हत्या; कुऱ्हाडीने वार करत हायवेच्या कडेला फेकला मृतदेह

Borkheda Murder Case : बोरखेडा पंचायतीच्या सरपंचाच्या पतीची निर्घृण हत्या; कुऱ्हाडीने वार करत हायवेच्या कडेला फेकला मृतदेह
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच, आता मध्य प्रदेशातून आणखी एक थरारक घटना समोर आली आहे. बोरखेडा पंचायतीच्या सरपंच ज्ञानीबाई यांचे पती रुमसिंग यांची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली असून, याप्रकरणी पोलिसांनी तब्बल ४० जणांना ताब्यात घेतले आहे.(Borkheda Murder Case)

घटनेची पार्श्वभूमी आणि मृतदेह सापडल्याची माहिती

रुमसिंग हे सकाळी साडेसातच्या सुमारास बोरखेडा येथे गेले होते, जिथे त्यांच्या गिरणीचे आणि पायाभरणीचे काम सुरू होते. ते रात्री नऊच्या सुमारास गावातून निघाले होते, मात्र त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह खांडवा-अमरावती राज्य महामार्गाच्या कडेला टांडा ते बोरखेडा या रस्त्यावर आढळून आला. रुमसिंग यांचे तिथे शेत असून ते केळीचा व्यवसाय करत होते.

मानेवर व डोक्यावर खोल जखमा

मृत रुमसिंग यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करण्यात आले होते. त्यांच्या मानेवर व डोक्यावर खोल जखमा आढळल्या आहेत. माहिती मिळताच पिपलोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुरावे गोळा केले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली असून, अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेंद्र तरणेकर यांनी तपासासाठी अनेक पथके तैनात केली आहेत. या घटनेमुळे मध्य प्रदेशसह देशभरात खळबळ उडाली आहे.(Borkheda Murder Case)

आठवडाभर वाद आणि हत्येची धमकी

रुमसिंग यांच्या हत्येपूर्वी गावप्रमुख आणि काही गावकऱ्यांमध्ये सुमारे आठवडाभर वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. विरोधी गटाचे सदस्य दुकानांमध्ये आणि चौकांमध्ये बसून निवडणुकीपूर्वी रुमसिंग यांना जीवे मारण्याची धमकी देत ​​होते, असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.(Borkheda Murder Case)

दोन वर्षांपूर्वी मुलाचीही झाली होती हत्या

विशेष म्हणजे, सुमारे दोन वर्षांपूर्वी रुमसिंग यांच्या मुलाचीही अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती. हत्येच्या १० दिवसांनंतर त्याचा मृतदेह जंगलात सापडला होता, ज्याप्रकरणी त्यावेळी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता वडिलांच्याही हत्येनंतर, आरोपींच्या अटकेस मदत करणाऱ्या योग्य माहितीसाठी पोलीस अधीक्षकांनी १०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >