Friday, September 11, 2026

Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळा २०२७साठी ‘कुंभ इनोव्हेशन चॅलेंज’, अर्जाची मुदत वाढवली

Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळा २०२७साठी ‘कुंभ इनोव्हेशन चॅलेंज’, अर्जाची मुदत वाढवली

Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७च्या नियोजनात तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा प्रभावी वापर करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण आणि आयआयटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘कुंभ इनोव्हेशन चॅलेंज २०२६’साठी अर्ज करण्याची मुदत आता ३० सप्टेंबर २०२६पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे स्टार्टअप्स, तंत्रज्ञान कंपन्या, संशोधक आणि नवोन्मेषकांना कुंभमेळ्यातील विविध आव्हानांवर तंत्रज्ञानाधारित उपाय सुचविण्यासाठी आणखी संधी मिळणार आहे.

महाकुंभमेळ्यासाठी १२ कोटींपेक्षा अधिक भाविक ?

सिंहस्थ महाकुंभमेळ्यासाठी १२ कोटींपेक्षा अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याचे व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष वापरता येतील, अशा तंत्रज्ञानाधारित उपायांचा शोध या चॅलेंजच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. भाविक कुंभनगरीत दाखल झाल्यापासून त्यांना मार्गदर्शन करणे, स्वच्छता व्यवस्थापन, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा, गोदावरीचे संरक्षण, कुंभमेळ्याचा डिजिटल वारसा जतन करणे आणि चुकीच्या माहितीला आळा घालणे या क्षेत्रांना या चॅलेंजमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे.

सिंहस्थ महाकुंभमेळ्याचा मोठा आवाका लक्षात घेता प्रत्यक्ष क्षेत्रात उपयोगी ठरणाऱ्या तंत्रज्ञानाधारित उपायांची गरज आहे. विविध क्षेत्रांतील नवोन्मेषकांनी या संधीचा लाभ घेऊन कुंभमेळा व्यवस्थापनातील आव्हानांवर व्यवहार्य आणि मोठ्या प्रमाणावर राबविता येतील असे उपाय सादर करावेत, असे कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

‘कुंभ इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहा विषय

या आव्हानासाठी ‘पहिला तास@कुंभ’, ‘स्वच्छ कुंभ ३६० अंश’, ‘कुंभ आपत्कालीन प्रतिसाद जाळे’, ‘गोदावरी संरक्षक’, ‘कुंभ आठवणी’ आणि ‘सत्यसंरक्षक कुंभ’ असे सहा विषय निश्चित करण्यात आले आहेत. निवड झालेल्या नवोन्मेषकांना त्यांच्या उपाययोजनांचे तज्ज्ञ आणि परीक्षकांसमोर प्रत्यक्ष सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. कुंभ इनोव्हेशन चॅलेंजसोबत ‘टेक मंथना’चेही आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञानाची नैतिकता, श्रद्धा, अध्यात्म आणि मानवी मूल्ये यांवर चर्चा होणार आहे. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि श्रद्धा’, ‘कुंभाचा डिजिटल वारसा’, ‘डीपफेकच्या युगातील सत्य आणि विश्वास’ तसेच ‘स्वायत्त कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती सार्वभौमत्व’ या विषयांवर तज्ज्ञ विचारमंथन करणार आहेत.

कोणाला सहभागी होता येणार ?

निधी प्राप्त स्टार्टअप्स आणि विस्तारक्षम नवउद्योग, तंत्रज्ञान कंपन्या, प्रणाली एकत्रीकरण करणाऱ्या कंपन्या, पायाभूत सुविधा-तंत्रज्ञान कंपन्या, शासकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील नवोन्मेषक, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, वैज्ञानिक आणि स्वतंत्र तज्ज्ञांना या आव्हानात सहभागी होता येणार आहे. सहभागींकडे कार्यरत उत्पादन, नमुना प्रारूप (प्रोटोटाइप) किंवा संकल्पनेच्या विकासाची ठोस प्रगती असणे अपेक्षित आहे. अर्जाची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२६ असल्याची माहिती कुंभमेळा प्राधिकरणाने दिली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >