Saturday, September 12, 2026

Nashik Kumbhmela : रस्ते कामांची कुंभ आयुक्त शेखर सिंह, आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडून पाहणी, गुणवत्तापूर्ण कामासह वाहतूक व उपयोगिता सेवांच्या समन्वयावर भर

Nashik Kumbhmela : रस्ते कामांची कुंभ आयुक्त शेखर सिंह, आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडून पाहणी, गुणवत्तापूर्ण कामासह वाहतूक व उपयोगिता सेवांच्या समन्वयावर भर

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरू असलेल्या रस्ते व पायाभूत सुविधा विकासकामांचा आढावा घेण्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण (एनटीकेएमए) आयुक्त शेखर सिंह आणि नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी गंगापूर रोड तसेच डोंगरे वसतिगृह ते शरणपूर पोलीस चौकी या मार्गांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

वाहतूक व उपयोगिता सेवांच्या समन्वयावर भर 

पाहणीदरम्यान रस्त्यालगतच्या पाणीपुरवठा, मलनिस्सारण, एमएनजीएल गॅस पाइपलाइन, ओएफसी तसेच खासगी कंपन्यांच्या ओएफसी केबल्स आदी उपयोगिता सेवांची पाहणी करण्यात आली. रस्ते कामांदरम्यान या सेवांचे योग्य नियोजन व संरक्षण तसेच संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय राखण्याच्या सूचना देण्यात आल्या. कॉमन मॅन चौकातील विद्युत खांबांचे योग्य पद्धतीने स्थलांतर करून डावीकडील वळणरस्ते वाहतुकीसाठी अडथळामुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच डोंगरे वसतिगृह ते शरणपूर पोलीस चौकी मार्गावरील रस्त्याची पातळी व उताराची पाहणी करून पावसाचे पाणी दुकाने, इमारती व आस्थापनांच्या प्रवेशद्वारांसमोर साचणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले.

गंगापूर नाका ते कॅनडा कॉर्नर या टप्प्यातील काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले असून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. कॅनडा कॉर्नर ते शरणपूर पोलीस ठाणे या उर्वरित मार्गाचे काम पुढील दहा दिवसांत पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी मुख्य रस्ते व जोडरस्त्यांवरील पाणी संकलन खड्ड्यांचीही तपासणी करण्यात आली.

रस्ते बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता तपासणी करूनच काम पुढे नेण्याच्या सूचना देण्यात आल्या. कामाची गती राखतानाच गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करू नये आणि सर्व कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, गुणवत्ता अभियंता नितीन पाटील, अधीक्षक अभियंता गुणवत्ता नियंत्रण (सेवानिवृत्त) किशोर पाटील, उपआयुक्त (नियोजन) एनटीकेएमए योगेंद्र चौधरी, उपअभियंता निलेश साळी व मक्तेदार प्रतिनिधी उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >