लंडन: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी आपला दोन दिवसांचा यूके दौरा पूर्ण केला. महाराष्ट्रात परदेशी गुंतवणूक आणण्यावर भर देत या दौऱ्यात त्यांनी ब्रिटिश उद्योगपती आणि गुंतवणूकदारांशी चर्चा केली. मात्र या व्यस्त दौऱ्यात शिंदे यांनी लंडनमध्ये अस्सल महाराष्ट्रीयन वडापावचा आस्वाद घेतला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे मिरचीसोबत वडापाव खाताना दिसत आहेत. शिवसेना नेते राहुल कनाल हे देखील त्यांच्यासोबत वडापावचा आस्वाद घेताना दिसले. परदेशातील दौऱ्यात महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतल्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
शिंदे यांच्या यूके दौऱ्याचा मुख्य उद्देश महाराष्ट्रात परदेशी गुंतवणूक आकर्षित करणं आणि ब्रिटनसोबत आर्थिक संबंध अधिक मजबूत करणं हा होता. भारत-यूके मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधींबाबत त्यांनी ब्रिटिश गुंतवणूकदारांशी चर्चा केली.
कोल्हापूर : “आमची माधुरी आम्हाला परत आणून द्या” अशी मागणी करणाऱ्या कोल्हापूरकरांची लाडकी माधुरी हत्तीण अखेर पुन्हा नांदणीत परतली आहे. गुजरातमधील ...
उपमुख्यमंत्री शिंदेच्या भाषणात महत्त्वाचे मुद्दे
हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भाषण करताना शिंदे यांनी 2030 पर्यंत महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष्य असल्याचं सांगितलं. महाराष्ट्राची मोठी बाजारपेठ, कुशल मनुष्यबळ आणि मजबूत पायाभूत सुविधा लक्षात घेता ब्रिटिश कंपन्यांनी राज्यात गुंतवणूक करावी, असं आवाहन त्यांनी केलं.
“डिझाइन लंडनमध्ये, उत्पादन महाराष्ट्रात,” असा संदेश देत त्यांनी ब्रिटिश उद्योगविश्वाला महाराष्ट्रातील संधींचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. राज्यातील आर्थिक कॉरिडॉर आणि औद्योगिक क्लस्टर्समुळे उद्योगांसाठी मोठ्या संधी उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं.
ब्रिटिश संसदेत घुमला जय महाराष्ट्र
दौऱ्यात शिंदे यांनी परदेशस्थ मराठी समुदायाशीही संवाद साधला. ब्रिटिश संसदेत त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ अशी घोषणा दिली. यावेळी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप’ सन्मान, तर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’ देण्यात आला. महाराष्ट्र मंडळ लंडनकडून त्यांना ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारानेही गौरवण्यात आलं.
विराट कोहलीची घेतली भेट
दौऱ्यात क्रीडा क्षेत्रातील सहकार्यावरही चर्चा झाली. शिंदे यांनी क्रिकेटपटू विराट कोहली आणि मेरीलेबोन क्रिकेट क्लबशी संबंधित सदस्याची भेट घेतली. महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातील संधी आणि सहकार्याबाबत यावेळी चर्चा झाली.
वेळेअभावी लॉर्ड्स क्रिकेट मैदानाला देण्यात येणारी नियोजित भेट रद्द करण्यात आली. मात्र भेटीच्या समारोपावेळी राहुल काळे यांनी शिंदे यांना 1983 च्या विश्वचषक स्पर्धेशी संबंधित मूळ धावफलक, कार्यक्रम पत्रिका आणि स्मरणिका पुस्तिका भेट दिली.






