Sunday, September 13, 2026

Mumbai Bangalore Highway : मुंबई-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात; 2 ठार, 12 जखमी

Mumbai Bangalore Highway :  मुंबई-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात; 2 ठार, 12 जखमी

पुणे : मुंबई-बंगळूर महामार्गावरील जांभूळवाडी परिसरातील दरी पुलावर शनिवारी मध्यरात्री चार वाहनांचा भीषण अपघात झाला. दोन ट्रक आणि दोन मोटारींच्या या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास एक ट्रक साताऱ्याच्या दिशेने मुंबईकडे जात होता. जांभूळवाडी येथील दरी पुलाजवळ ट्रक चालक प्रमोद विठ्ठल वाघ यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रक त्याच लेनमधून पुढे जाणाऱ्या आयशर ट्रकवर जोरदार आदळला.

दोन्ही ट्रकची धडक इतकी जोरदार होती की ते दुभाजक तोडून विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर गेले. त्याचवेळी समोरून येणाऱ्या एर्टिगा आणि टाटा अल्ट्रोझ या दोन मोटारींना ट्रकने धडक दिली. काही क्षणांत चार वाहनांचा हा अपघात झाला.

या दुर्घटनेत टाटा अल्ट्रोझमधील आनंदीबाई रामचंद्र वाडकर (वय 50, रा. नेरूळ, नवी मुंबई) आणि हृदयनाथ मोहन गायकवाड (रा. जोगेश्वरी पूर्व, मुंबई) यांचा मृत्यू झाला. तर या अपघातात एकूण 12 जण जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच आंबेगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी, भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलिस तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले.

दरम्यान, अपघातग्रस्त वाहने महामार्गावरच अडकल्याने काही काळ वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. अखेर क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. त्यानंतर वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली.

या अपघातामागचे नेमके कारण आणि ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण कशामुळे सुटले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >