Sunday, September 13, 2026

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी! ३८६ विशेष ट्रेन अन् मध्यरात्रीपर्यंत मेट्रो सेवा

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी! ३८६ विशेष ट्रेन अन् मध्यरात्रीपर्यंत मेट्रो सेवा

मुंबई : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरातून लाखो चाकरमानी कोकणातील आपल्या गावी रवाना झाले आहेत. यंदा १४ सप्टेंबरला गणरायाचं आगमन होत असल्याने रेल्वे, मेट्रो आणि रस्ते मार्गावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांची व्यवस्था केली असून मुंबई मेट्रोच्या फेऱ्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक वाढल्याने रायगड परिसरात अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. (Ganeshotsav 2026)

३८६ विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था

गणेशोत्सवातील अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेकडून देशभरात ३८६ विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. यामध्ये मध्य रेल्वेच्या २५८, पश्चिम रेल्वेच्या ६४, कोकण रेल्वेच्या ५८ आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या ६ विशेष गाड्यांचा समावेश आहे. मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी सीएसएमटी ते सावंतवाडी रोडदरम्यान अनारक्षित विशेष सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Ganeshotsav 2026)

१२ ते १४ सप्टेंबरदरम्यान या मार्गावर आणखी चार विशेष फेऱ्या होणार आहेत. कोकणात जाण्या-येण्यासाठी आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक प्रवाशांनी आरक्षण केलं आहे, तर जवळपास एक लाख प्रवासी अनारक्षित तिकिटांवर प्रवास करण्याची शक्यता आहे. १३ सप्टेंबरला दुपारी १.४५ वाजता सीएसएमटीहून अनारक्षित विशेष गाडी रवाना होईल, तर १४ सप्टेंबरला पहाटे ४.०५ वाजता सावंतवाडीहून मुंबईच्या दिशेने परतीची विशेष गाडी सुटणार आहे. (Ganeshotsav 2026)

गणेशोत्सवात मेट्रोची वेळ वाढली

मुंबईतील गणेशोत्सवाची गर्दी लक्षात घेऊन १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान मेट्रोच्या सेवेत वाढ करण्यात आली आहे. मेट्रो मार्गिका २ए, ७, ९ आणि २बीवरील शेवटच्या फेऱ्या आता रात्री १२.३० वाजेपर्यंत उपलब्ध राहतील. यापूर्वी या मार्गांवर रात्री ११ वाजता सेवा समाप्त होत होती. या कालावधीत दररोज १० ते १५ अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

मेट्रो लाइन १ अर्थात वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावरही रात्री उशिरापर्यंत सेवा सुरू राहणार आहे. वर्सोवा येथून घाटकोपरसाठी शेवटची मेट्रो रात्री १२.१५ वाजता, तर घाटकोपरहून वर्सोवासाठी शेवटची फेरी रात्री १२.४० वाजता सुटेल. अॅक्वा लाइन ३ वरही गणेशोत्सव काळात मध्यरात्रीपर्यंत अतिरिक्त सेवा उपलब्ध राहणार आहे. (Ganeshotsav 2026)

रायगडमध्ये महामार्गावर वाहनांच्या रांगा

दरम्यान, कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने रायगड जिल्ह्यातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील खालापूर टोलनाका ते खोपोली-पाली मार्गावरील पाली फाट्यापर्यंत सुमारे दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे, इंदापूर आणि माणगाव परिसरातही वाहतुकीचा वेग मंदावला आहे. (Ganeshotsav 2026)

ही कोंडी टाळण्यासाठी अनेक प्रवाशांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेने खालापूर गाठून पुढे पाली, विळे, निजामपूरमार्गे माणगावकडे जाण्याचा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळे या पर्यायी मार्गावरही वाहनांची संख्या वाढली आहे. रायगड पोलिसांकडून प्रवाशांना वाहतूक परिस्थितीनुसार या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. (Ganeshotsav 2026)

लाखो चाकरमानी कोकणात दाखल

गणरायाच्या स्वागतासाठी मुंबई आणि परिसरातून निघालेले लाखो चाकरमानी सलग दुसऱ्या दिवशी कोकणात पोहोचले आहेत. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत असून, काही नियमित गाड्या तीन ते चार तास उशिराने धावत आहेत. कोकणकन्या एक्स्प्रेस, तुतारी एक्स्प्रेस आणि कोईम्बतूर एक्स्प्रेससह काही गाड्यांच्या वेळापत्रकावरही गर्दीचा परिणाम झाला आहे. (Ganeshotsav 2026)

शनिवारी कामाचा दिवस संपल्यानंतर मोठ्या संख्येने मुंबईकरांनी गावाची वाट धरली. गणपती स्पेशल ट्रेनच्या माध्यमातूनही हजारो चाकरमानी कोकणात पोहोचले आहेत. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर तब्बल ३२५ हून अधिक अतिरिक्त फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेनेही विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था केली आहे.

रत्नागिरीसह कोकणातील विविध रेल्वे स्थानकांवर सध्या चाकरमान्यांची गर्दी वाढली असून, लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी संपूर्ण कोकण सज्ज झालं आहे. (Ganeshotsav 2026)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >