Sunday, September 13, 2026

Seemanchal Express Accident : सीमांचल एक्सप्रेसमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! ट्रेनमधून ९ महिन्यांचं बाळ पडलं; २३ तासांनी सापडला मृतदेह

Seemanchal Express Accident : सीमांचल एक्सप्रेसमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! ट्रेनमधून ९ महिन्यांचं बाळ पडलं; २३ तासांनी सापडला मृतदेह

दिल्लीतील आनंद विहारहून बिहारच्या दिशेने निघालेल्या सीमांचल एक्सप्रेसमध्ये हृदयद्रावक घटना घडली. ट्रेनमधून प्रवास करत असताना ९ महिन्यांचं बाळ प्रयागराजजवळ आपत्कालीन खिडकीतून रेल्वे रुळांवर पडलं. तब्बल २३ तासांच्या शोधमोहिमेनंतर फैजुल्लापूर स्टेशनजवळील झुडपांमध्ये त्याचा छिन्नविछिन्न मृतदेह आढळून आला. खगरिया जिल्ह्यातील रहिवासी मोहन कुमार हे पत्नी काजल आणि आपल्या ९ महिन्यांच्या मुलासह सीमांचल एक्सप्रेसच्या एस-१ डब्यातून प्रवास करत होते. पहाटे सुमारे ४.१७ वाजता मोहन यांच्या लक्षात मुलगा जागेवर नसल्याचं आलं. (Seemanchal Express Accident)

त्याचवेळी आपत्कालीन खिडकी उघडी असल्याचंही दिसून आलं. त्यामुळे मुलगा ट्रेनमधून खाली पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. दाम्पत्याने तातडीने ट्रेनची साखळी ओढण्याचा प्रयत्न केला; मात्र जंगलाचा परिसर असल्याचं सांगत काही प्रवाशांनी त्यांना रोखल्याचा दावा आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. जीआरपी आणि जीआरपीएफच्या पथकांनी रात्रभर शोध घेतला, तर शनिवारी नागरी पोलिसांचीही मदत घेण्यात आली. अखेर घटनेनंतर सुमारे २३ तासांनी मुलाचा मृतदेह फैजुल्लापूर स्टेशनजवळ सापडला. मुलाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच बिहारला जात असलेल्या या कुटुंबावर प्रवासातच दुःखाचा डोंगर कोसळला. (Seemanchal Express Accident)

दरम्यान, बिहारच्या बेगुसरायमध्येही रेल्वे अपघाताची आणखी एक घटना समोर आली आहे. लाखो पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रमजानपूर रेल्वे क्रॉसिंगजवळ एका विवाहित तरुणाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. मृताची ओळख मोहम्मद शमी अशी झाली असून, तो विवाहित होता आणि त्याला एक मूल असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, शमी गेल्या चार वर्षांपासून एका तरुणीच्या प्रेमात होता. शुक्रवारी संबंधित तरुणीने लग्नाबाबत चर्चा करण्यासाठी त्याला घरी बोलावलं होतं; मात्र तिच्या कुटुंबीयांनी या नात्याला विरोध केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर काही वेळातच रेल्वे रुळांजवळ त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे. (Seemanchal Express Accident)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >