दुबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने पुन्हा एकदा आशियाई क्रिकेटवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. महिला आशिया चषक २०२६च्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा तब्बल ७२ धावांनी पराभव करत विक्रमी आठव्यांदा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी एकत्रितपणे शानदार कामगिरी करत श्रीलंकेला कोणतीही संधी दिली नाही.(Women’s Asia Cup 2026)
शफाली-मंधानाची वादळी सलामी
नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांनी सुरुवातीपासूनच श्रीलंकेच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. दोघींनी पहिल्या विकेटसाठी तब्बल १२९ धावांची भागीदारी करत भारताला मजबूत सुरुवात करून दिली. शफालीने अवघ्या २४ चेंडूत अर्धशतक झळकावत महिला टी-२० आशिया चषकाच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतकाची नोंद केली. तिने ३९ चेंडूत ६८ धावांची आक्रमक खेळी केली, तर मंधानाने ३९ चेंडूत ५९ धावा केल्या.(Women’s Asia Cup 2026)
या दमदार सुरुवातीच्या जोरावर भारताने २० षटकांत ५ बाद १८३ धावा उभारल्या. त्यामुळे श्रीलंकेसमोर विजयासाठी १८४ धावांचे मोठे लक्ष्य होते.
न्यूयॉर्क: अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत एक अत्यंत रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. सलग तिसऱ्यांदा अमेरिकन ओपनचे चॅम्पियन बनण्याचे आर्यना ...
श्री चरणीच्या फिरकीसमोर श्रीलंका ढेपाळली
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेला भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच दबावाखाली ठेवले. श्री चरणीने ४ बळी घेत श्रीलंकेच्या फलंदाजीचा कणा मोडला. तिच्यासोबत दीप्ती शर्मानेही प्रभावी गोलंदाजी करत ३ बळी मिळवले. भारतीय फिरकीसमोर श्रीलंकेच्या फलंदाजांना मोठी भागीदारी करता आली नाही. अखेर श्रीलंकेचा डाव १११ धावांत आटोपला आणि भारताने ७२ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
या विजयासह भारताने २०२४च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेकडून झालेल्या पराभवाची परतफेडही केली. महिला आशिया चषकाच्या इतिहासात भारताचे हे आठवे विजेतेपद असून, या स्पर्धेवरील भारतीय संघाचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. फलंदाजीत शफाली-मंधानाची फटकेबाजी आणि गोलंदाजीत श्री चरणी-दीप्तीची फिरकी या विजयाची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली.(Women’s Asia Cup 2026)
भारतीय महिला क्रिकेट संघाने या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत अंतिम सामन्यातही आपली सर्वोत्तम बाजू दाखवली. आता या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय महिला क्रिकेटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.