Tuesday, September 15, 2026

BMC : मुंबईत अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी ७६ वाहने तैनात

BMC : मुंबईत अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी ७६ वाहने तैनात

फेरीवाल्यांसह अतिक्रमण मुक्त पदपथ मोहिमेला आणि अधिक बळकटी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने पदपथ अतिक्रमण मुक्त करण्याची मोहिम हाती घेण्यात आली असून या मोहिमेला आता अधिक बळ देण्यासाठी तब्बल ७६ वाहने भाडेतत्वावर घेतली जाणार आहेत. शहर आणि उपनगरांसाठी ही वाहने भाडेतत्वावर घेण्यासाठी स्थायी समितीच्या वतीने मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे फेरीवाल्यांसह महापालिकेच्यावतीने अतिक्रमण हटवताना त्यांचे साहित्य जप्त करून देण्यासाठी हा वाहनांचा ताफा उपलब्ध करून दिल्यामुळे या कारवाईला आता अधिक बळ मिळणार आहे. (BMC)

मुंबई महानगरपालिकेच्या शहर आणि उपनगरांसाठी विविध विभागात अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईसाठी अनुज्ञापन विभागाच्या वापराकरिता अनुक्रमे २७ आणि ४९ अतिक्रमण निर्मुलन वाहने ही भाडे तत्त्वावर कामगारांशिवाय घेतली जात आहे. याबाबतचे दोन्ही प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. शहर विभागातील २७ अतिक्रमण निर्मूलन वाहनाची सेवा ही एकूण ९,८५५ पाळ्यांमध्ये ३६५ दिवस घेतली जाणार आहे. यासाठभ् इन्झफ्रा ट्रान्सप्रोजेक्ट्स या कंपनीची निवड करण्यात आली असून ३०५० रुपये प्रतिपाळी याप्रमाणे ३. १२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. (BMC)

तर पश्चिम उपनगरे विभागातील ४९ अतिक्रमण निर्मूलन वाहनाची सेवा ही एकूण १७,८८५ पाळ्यांमध्ये घेतली जाणार आहे. यासाठी एस. डी. शिरोळे ट्रान्सपोर्ट कंपनी या कंपनीची निवड करण्यात आली असून ३०४२ रुपये प्रति पाळी याप्रमाणे एकूण ५.६५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. (BMC)

अतिक्रमण निर्मूलन कार्यवाहीचे काम अव्याहत स्वरुपाचे असून ते अखंडितपणे सुरू ठेवणे आवश्यक आहे व त्याकरिता अतिक्रमण निर्मूलन वाहने पुरविण्याची व्यवस्था करणे गरजेचे असते. मुंबईतील विविध विभागात अतिक्रमण निर्मुलन कार्यवाहीच्या वेळी अनधिकृतपणे व्यवसाय करणा-या फेरीवाल्यांवर प्रभावीरित्या कार्यवाही करण्यासाठी या अतिक्रमण निर्मूलन वाहनाचा वापर करण्यात येईल,असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच अतिक्रमण मुक्त पदपथ या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी ही वाहने आवश्यक असून यामुळे या मोहिमेला अधिक बळकटी येईल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. (BMC)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >