Saturday, October 31, 2026

Pune Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ; लंडनहून परतलेल्या तरुणीचा आलिशान फ्लॅटमध्ये कुजलेला मृतदेह आढळला

गहुंजे येथील एका आलिशान गृहप्रकल्पात उच्चशिक्षित तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. ती छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवृत्त मुख्य अभियंत्याची मुलगी होती. लंडनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या मुग्धाचा असा धक्कादायक मृत्यू झाल्याने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

गहुंजे येथील एका आलिशान गृहप्रकल्पात उच्चशिक्षित तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मुग्धा अविनाश देशमुख (वय 34, रा. छत्रपती संभाजीनगर) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवृत्त मुख्य अभियंत्याची मुलगी होती. लंडनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या मुग्धाचा असा धक्कादायक मृत्यू झाल्याने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

लंडनहून गुपचूप भारतात आगमन

मुग्धा जुलै 2025 मध्ये एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेली होती. तेथून ती नियमितपणे कुटुंबाच्या संपर्कात होती. 23 ऑक्टोबर 2026 रोजी तिचे आईशी शेवटचे बोलणे झाले, ज्यामध्ये तिने एका मुलाखतीला जात असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर तिचा फोन बंद झाला आणि संपर्क तुटला. चिंतेत पडलेल्या कुटुंबीयांनी लंडन येथील तिच्या मैत्रिणींशी संपर्क साधला असता, मुग्धाने ऑगस्ट २०२६ च्या शेवटीच लंडन सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली. दोन महिन्यांपूर्वी भारतात परतल्यानंतरही तिने हे रहस्य कुटुंबापासून लपवून ठेवले होते. मुलगी गायब झाल्याने पालकांनी छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुरा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

बँक व्यवहार अन् ऑनलाइन डिलिव्हरीमुळे लागला सुगावा

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. मुग्धाचे मोबाईल लोकेशन आणि बँक खात्यांचे विश्लेषण केले असता, तिचे क्रेडिट कार्ड 'झोमॅटो', 'स्विगी' आणि 'ब्लिंकिट' यांसारख्या ॲप्सवर सातत्याने वापरले जात असल्याचे दिसले. यावरून ती परदेशात नसून भारतातच असल्याचे निष्पन्न झाले. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी गहुंजे येथील 'लोढा बेलमोंडो' सोसायटीतील एका बंद फ्लॅटचा पत्ता शोधला. पोलीस तेथे पोहोचले तेव्हा फ्लॅटचा मुख्य दरवाजा आतून बंद होता. चावी बनवणाऱ्याच्या मदतीने दरवाजा उघडला असता, बेडरूममध्ये मुग्धाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

घटनास्थळी औषधे सापडली; पोलीस तपास सुरू

शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुग्धा ऑगस्ट महिन्यापासून या फ्लॅटमध्ये भाड्याने एकटीच राहत होती आणि ऑनलाइन क्लासेस घेऊन स्वतःचा खर्च भागवत होती. 21 ऑक्टोबर रोजी तिने घरातील मोलकरणीलाही कामावरून काढून टाकले होते. मृतदेहाजवळ पोलिसांना काही औषधे सापडली असून, प्राथमिक अंदाजानुसार ही आत्महत्या असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, तिने लंडन का सोडले, भारतात येऊन कुटुंबापासून ही बाब का लपवली आणि हे टोकाचे पाऊल का उचलले, या सर्व प्रश्नांचा पोलीस सखोल तपास करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >