Wednesday, September 16, 2026

Nashik : नागरी प्रश्नांचा आढावा, प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा; महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

Nashik : नागरी प्रश्नांचा आढावा, प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा; महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

Nashik : नाशिक महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजासह श्री गणेशोत्सव आणि आगामी सण-उत्सवांच्या पूर्वतयारीचा आढावा महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री उपस्थित होते.

बैठकीत महानगरपालिकेच्या ई-कनेक्ट संकेतस्थळावरील नागरिकांच्या तक्रारी, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचे नियोजन व समन्वय, गणेशोत्सवाची पूर्वतयारी, शहर स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलन आणि विविध नागरी प्रश्नांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांकडून प्राप्त तक्रारी आणि विविध विभागांशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले. नागरिकांना आवश्यक सेवा वेळेत मिळाव्यात तसेच विभागांमध्ये योग्य समन्वय राखून प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करावीत, अशा सूचना महापौरांनी दिल्या.

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील स्थानिक गरजा लक्षात घेऊन या उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार असून, नागरिकांचा सक्रिय सहभाग घेऊन सेवाभावी व नागरिकोपयोगी उपक्रमांना व्यापक स्वरूप देण्यात येणार आहे. अभियानाच्या कालावधीत महानगरपालिकेच्या विविध विभागांनी नियोजनबद्ध पद्धतीने उपक्रम राबवून त्यांची वेळेत पूर्तता करावी आणि त्याचा थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवावा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.

१७ सप्टेंबरपासून ‘सेवा संकल्प अभियान’

महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या निर्देशानुसार नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १७ सप्टेंबरपासून ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार हे अभियान १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होणार आहे. अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना विविध सेवा व सुविधा अधिक सुलभ आणि परिणामकारकपणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच ‘सेवा माझे योगदान’ या उपक्रमातून लोकसहभागाच्या माध्यमातून विविध नागरिकोपयोगी व सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये स्वच्छता, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, प्लास्टिकमुक्ती, रस्ते सुरक्षा, जलसंधारण, जलस्रोत स्वच्छता, कचरा वर्गीकरण व खतनिर्मिती, महिला आरोग्य व स्वच्छता तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल साक्षरता आदी उपक्रमांचा समावेश आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >