Thursday, November 19, 2026

आजपासून बुलेट ट्रेनच्या ट्रॅकवर हाय- व्होल्टेज वीजपुरवठा सुरू होणार, पण ट्रेन केव्हापासून धावणार?

सूरत ते बिलिमोरा परिसरात वीजपुरवठा सुरू करण्यात येणार आहे, यामाध्यमातून मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने मोठा टप्पा गाठला आहे. 2027 मध्ये प्रवाशांच्या सेवेत येणाऱ्या या हाय- स्पीड कॉरिडोरची वैशिष्ट्ये आणि रेल्वे प्रशासनाची महत्त्वाची सुरक्षा सूचना जाणून घ्या.

मुंबई: भारत देश वाहतूक क्षेत्रात नवा इतिहास रचण्याची तयारी वेगाने सुरू करत आहे. 2027 मध्ये मुंबई- अहमदाबाद हाय- स्पीड रेल कॉरिडोरचा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई- अहमदाबाद मार्गावर देशामध्ये पहिली बुलेट ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या भव्य प्रकल्पासाठी 20 नोव्हेंबर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे, कारण सूरत आणि बिलिमोरा दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात वीजपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन रुळांवरून धावण्यापूर्वीचा हा मोठा आणि निर्णायक टप्पा मानला जात आहे.

नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने या संदर्भातील माहिती त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेअर केली आहे. मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडोरमधील सूरत ते बिलिमोरा दरम्यानच्या 50 किमी लांबीच्या पहिल्या पट्ट्याला ओव्हरहेड इक्विपमेंटद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. हा संपूर्ण कॉरिडोर प्रोजेक्ट, प्रगत 2× 25 KV ओव्हरहेड ट्रॅक्शन प्रणालीने सुसज्ज केला जात आहे. यामध्ये एलिव्हेटेड मार्गावरील अप आणि डाउन अशा दोन्ही मार्गिकांचा समावेश आहे. ही हाय- स्पीड बुलेट ट्रेन चालवण्यासाठी 2× 25 KV ओव्हरहेड ट्रॅक्शन प्रणालीच्या माध्यमातून वीजपुरवठा देण्यात येणार आहे. मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गादरम्यान, संपूर्ण विद्युतीकरण जाळ्यात 14 ट्रॅक्शन सबस्टेशन असतील. त्यापैकी 9 गुजरातमध्ये आणि 5 महाराष्ट्रात उभारण्यात येत आहेत.

508 किमी लांबीच्या या मार्गावर ठराविक ठिकाणी ही सबस्टेशन कार्यरत राहणार आहे. ग्रीडमधून वीज घेऊन ती ओव्हरहेड यंत्रणेकडे पोहोचवण्याचे काम या माध्यमातून करण्यात येणार आहे. या संपूर्ण विद्युत जाळ्याचे नियंत्रण आणि देखरेख एका सेंट्रलाइज्ड कंट्रोल सेंटरद्वारे केली जाणार आहे. दरम्यान, वीजपुरवठा सुरू केला जात असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने सर्वांना विशेष खबरदारीचा इशारा दिला आहे. मार्गालगत राहणारे नागरिक, प्रवास करणारे, बांधकामाशी संबंधित कर्मचारी आणि परिसरातील इतर लोकांनी ओव्हरहेड विद्युत उपकरणांच्या जवळ जाऊ नये तसेच त्यांना हात लावू नये, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे. ही बुलेट ट्रेन पूर्ण क्षमतेने जेव्हापासून सुरू होईल, तेव्हापासून ती ताशी 320 किलोमीटर इतका वेग गाठू शकेल. तर 2027 पासून अहमदाबाद ते मुंबई दरम्यान सरासरी ताशी 300 किलोमीटर वेगाने चालवली जाण्याची शक्यता आहे.

508 किमीचा कॉरिडोर महाराष्ट्र, गुजरात आणि दादरा व नगर हवेलीमधून जातो. या मार्गावर मुंबई (बीकेसी), ठाणे, विरार, बोइसर, वापी, बिलिमोरा, सूरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती अशी 12 प्रमुख स्थानके निश्चित करण्यात आली आहेत. या प्रकल्पात कंपाउंड कॅटेनरी प्रणालीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, कारण ती बुलेट ट्रेनला ताशी 320 किलोमीटरपर्यंतचा वेग गाठण्यास मदत करणार आहे. देशातील हाय- स्पीड रेल्वे कॉरिडोरवर या तंत्रज्ञानाचा पहिल्यांदाच वापर केला जात आहे. मुख्य कॅटेनरी तार आणि संपर्क तार यांच्यामध्ये एक अतिरिक्त सहायक तार बसवून अतिवेगवान गाड्यांना अखंड आणि स्थिर वीजपुरवठा करणे, हे या आधुनिक प्रणालीचे वैशिष्ट्य आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >