
सध्या गेमिंग विश्वात GTA 6 ची मोठी चर्चा सुरू आहे. या गेमची क्रेझ पाहता अनेकजण तो मोफत डाउनलोड करण्यासाठी इंटरनेटवर लिंक शोधत आहेत. मात्र, तुम्हीही GTA 6 फ्रीमध्ये डाउनलोड करण्याचा विचार करत असाल, तर सावध व्हा! कारण एका चुकीच्या लिंकवर क्लिक केल्याने तुमची वैयक्तिक माहिती आणि बँक खात्यातील पैसे धोक्यात येऊ शकतात. GTA 6 च्या लोकप्रियतेचा फायदा घेत सायबर ठगांनी फसवणुकीचे नवे जाळे तयार केले आहे.
GTA 6 च्या नावाने इंटरनेटवर बनावट डाउनलोड लिंक, मोफत गेमचे आमिष आणि स्वस्त प्री-ऑर्डर कोडच्या जाहिराती केल्या जात आहेत. Malwarebytes आणि Netcraft या सायबर सुरक्षा कंपन्यांच्या तपासात अशा अनेक संशयास्पद वेबसाइट्स समोर आल्या आहेत. या वेबसाइट्सच्या माध्यमातून युजर्सची वैयक्तिक माहिती चोरणे आणि आर्थिक फसवणूक करणे हा ठगांचा मुख्य उद्देश आहे.
फ्री गेमच्या आमिषाने Google अकाउंटवर डल्ला
काही वेबसाइट्स GTA 6 मोफत खेळण्याची संधी देण्याचा दावा करत आहेत. मात्र, गेमचा अॅक्सेस मिळवण्यासाठी युजर्सना Google अकाउंटद्वारे लॉगिन करण्यास किंवा वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यास सांगितले जाते. काही ठिकाणी तर हुबेहूब Google लॉगिन पेज तयार करण्यात आले आहेत. अशा बनावट पेजवर लॉगिन केल्यास तुमच्या अकाउंटची माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती लागू शकते. याशिवाय फ्री कोड जनरेटर आणि गेम डाउनलोडच्या नावाखालीही युजर्सना जाळ्यात ओढले जात आहे.
Technology News: Instagram वापरणाऱ्यांसाठी एक नवे फीचर आणण्यात आले आहे. अनेकदा घाईत स्टोरी पोस्ट केल्यानंतर त्यातील स्पेलिंगची चूक, मजकूर किंवा स्टिकर बदलण्याची गरज ...
GTA 6 च्या नावाने बनावट Android अॅप्स
Malwarebytes च्या तपासात GTA 6 शी संबंधित एका वेबसाइटवर संशयास्पद Android अॅप्स आढळले. मात्र, हे GTA 6 चे अधिकृत मोबाइल व्हर्जन नव्हते. जाहिराती दाखवण्याच्या उद्देशाने हे अॅप्स तयार करण्यात आले होते. विशेष म्हणजे, Rockstar Games ने Android किंवा iOS साठी GTA 6 चे कोणतेही अधिकृत व्हर्जन जारी केलेले नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे, Netcraft च्या तपासात एका वेबसाइटवरील डाउनलोड फाइलला VirusTotal वरील ६८ अँटीव्हायरस प्रोग्रामपैकी ३४ प्रोग्रामनी संशयास्पद ठरवले. या फाइलची ट्रोजन म्हणून ओळख झाली. त्याच वेबसाइटवरील दुसऱ्या लॉन्चरला ६२ पैकी १८ सुरक्षा प्रणालींनी धोकादायक असल्याचे सांगितले. एवढेच नाही, तर या लॉन्चरच्या माध्यमातून युजर्सकडे १०० डॉलर किमतीच्या क्रिप्टोकरन्सीची मागणीही करण्यात आली.
स्वस्त प्री-ऑर्डरच्या नावानेही फसवणूक
GTA 6 स्वस्तात मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या गेमर्सनाही सायबर ठग लक्ष्य करत आहेत. काही वेबसाइट्स गेमच्या प्री-ऑर्डर कोडवर मोठ्या सवलती देण्याचा दावा करत आहेत. Malwarebytes ला अशाच एका वेबसाइटवर GTA 6 ची किंमत ६९.९९ युरोंऐवजी ५२.९९ युरो दाखवलेली आढळली. मात्र, पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी युजर्सकडून ई-मेल, गेमिंग प्लॅटफॉर्म आणि प्रदेशाची माहिती मागितली जात होती. पेमेंटसाठी कार्ड, PayPal, बँक ट्रान्सफर आणि क्रिप्टोकरन्सीचे पर्यायही देण्यात आले होते. ही वेबसाइट नवीन आणि अज्ञात असल्याने तिच्यावर व्यवहार करणे धोकादायक ठरू शकते.
Gold Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या बाजारात घसरणीचे सत्र सुरूच आहे. एकीकडे सोन्याने काही महिन्यांपूर्वी विक्रमी उच्चांक गाठला होता, तर ...
GTA 6 च्या नावाने होणाऱ्या फसवणुकीपासून कसे वाचाल ?
- अनोळखी वेबसाइटवर Google किंवा गेमिंग अकाउंटची लॉगिन माहिती देऊ नका.
- कोणत्याही डाउनलोड लिंकवर क्लिक करण्यापूर्वी वेबसाइटची अधिकृतता तपासा.
- Android, iOS किंवा PC साठी मोफत GTA 6 डाउनलोड देण्याच्या दाव्यांवर विश्वास ठेवू नका.
- गेम खरेदी करताना अधिकृत विक्रेता आणि वेबसाइटची खात्री करा.
- संशयास्पद लिंकवर क्लिक केले असल्यास वेबसाइट त्वरित बंद करा.
- लॉगिन माहिती दिली असल्यास तातडीने पासवर्ड बदला आणि टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करा.
- संशयास्पद फाइल डाउनलोड झाली असल्यास ती उघडू नका आणि डिव्हाइसची सुरक्षा तपासा.
- बँक किंवा कार्डची माहिती शेअर झाली असल्यास त्वरित बँकेशी संपर्क साधा.
एकूणच, GTA 6 ची वाढती लोकप्रियता सायबर ठगांसाठी फसवणुकीची संधी ठरत आहे. त्यामुळे गेम मोफत मिळवण्याच्या आमिषाला बळी पडण्याऐवजी अधिकृत माध्यमातूनच गेम डाउनलोड किंवा खरेदी करा. लक्षात ठेवा, एका चुकीच्या क्लिकची किंमत तुम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानीच्या स्वरूपात मोजावी लागू शकते.






