मुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा हाती घेतलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पक्षातील भूमिका अधिक ठळक करण्यासाठी विशेष जनसंपर्क अभियान आखण्यात आले आहे. २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांचे राज्यभर दौरे आयोजित करण्याचे नियोजन असून, ‘आपल्या वहिनी आहेत ना!’ या घोषवाक्याभोवती हे अभियान राबविले जाणार असल्याचे समजते. प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या रणनीतीचा भाग म्हणून याकडे पाहिले जात आहे.(Prashant Kishor Strategy)
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री तसेच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. जानेवारीमध्ये त्यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड झाली होती आणि त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.(Sunetra Pawar Image Building)
मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील सेमाना येथे प्रस्तावित मत्स्यालयाची उभारणी अत्याधुनिक, नाविन्यपूर्ण आणि आकर्षक पद्धतीने करावी. पारंपरिक स्वरूपाचे ...
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या प्रचारात ‘एकच वादा, अजित दादा’ ही घोषणा सातत्याने वापरली जात होती. त्यांच्या निधनानंतर पक्षाच्या जनसंपर्कासाठी आता ‘आपल्या वहिनी आहेत ना!’ हा नवा संदेश पुढे करण्याचे नियोजन असल्याचे सूत्रांनी सांगितले. या घोषवाक्याच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांचे कार्यकर्ते आणि मतदारांशी असलेले भावनिक नाते अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागांत सुनेत्रा पवार यांचे दौरे आणि महिलांच्या सहभागाचे कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन आहे.(Prashant Kishor Strategy)
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीच्या आधी पक्षाच्या प्रचारात गुलाबी रंगाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पक्षाच्या प्रचार साहित्यापासून सभांच्या व्यासपीठांपर्यंत गुलाबी रंगाची दृश्य ओळख तयार करण्यात आली होती. आता सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची नवी प्रतिमा तयार करण्याच्या दृष्टीने अशाच प्रकारे नियोजनबद्ध जनसंपर्कावर भर दिला जाणार असल्याचे समजते. पक्षाच्या अलीकडील बैठकीत मतदार नोंदणी मोहीम, जिल्हानिहाय दौरे आणि नाशिक येथील अधिवेशनाच्या तयारीवरही चर्चा झाल्याचे वृत्त आहे.(Sunetra Pawar Image Building)
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची संघटना मजबूत असल्याचे पक्षातील नेते सातत्याने सांगत आहेत. पक्षाचे मंत्री दत्ता भरणे यांनीही अलीकडे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली संघटना भक्कम असल्याचे म्हटले होते. त्यामुळे नाशिक अधिवेशनाच्या निमित्ताने पक्षाच्या नव्या नेतृत्वाची प्रतिमा आणि जनसंपर्क अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने आखलेल्या या अभियानाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.(Prashant Kishor Strategy)





