
पालघर : पालघर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याने पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डहाणू तालुक्यातील मतेगाव येथे बिबट्याने 65 वर्षीय महिला शेतमजुरावर हल्ला करून तिचा जीव घेतला. तुळशी रामा सावर असे मृत महिलेचे नाव असून, त्या विक्रमगड तालुक्यातील सरशी गावातील रहिवासी होत्या. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने बिबट्याला पकडण्याची मागणी केली आहे.
कामावरून परतताना बिबट्याची झडप
मिळालेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास तुळशी सावर या शेतातील काम आटोपून परतत होत्या. मतेगाव परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर झडप घातली. बिबट्याने त्यांच्या मानेवर हल्ला केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत बिबट्या अंधाराचा फायदा घेत जवळच्या जंगलात पसार झाला होता. मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मुंबई : सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि भेसळमुक्त अन्न मिळावे, यासाठी महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात विशेष तपासणी ...
वनविभागाच्या कारवाईची ग्रामस्थांची मागणी
या घटनेनंतर मतेगाव आणि आसपासच्या परिसरातील शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात तातडीने ट्रॅप कॅमेरे आणि पिंजरे लावण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बिबट्याला लवकर पकडण्यात आले नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. शेतीच्या कामासाठी बाहेर पडणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
एका महिन्यात दुसरी घटना; पालघरमध्ये चिंता वाढली
पालघर जिल्ह्यात यापूर्वी 9 ऑक्टोबर रोजी नवली परिसरातील भोगळे पाडा येथे 52 वर्षीय महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर मतेगाव येथील घटनेमुळे मानव-बिबट्या संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून होत आहेत. त्यामुळे वनविभागाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. या घटनेनंतर वनविभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी कोणती पावले उचलली जातात आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षितता कशी दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





