Thursday, September 17, 2026

Censor Board : सेन्सॉर बोर्डाची पुनर्रचना; प्रीती झिंटा, पंकज त्रिपाठींसह 18 नव्या सदस्यांचा समावेश

Censor Board : सेन्सॉर बोर्डाची पुनर्रचना; प्रीती झिंटा, पंकज त्रिपाठींसह 18 नव्या सदस्यांचा समावेश

मुंबई :  केंद्र सरकारने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजेच CBFC ची पुनर्रचना केली आहे. नव्या मंडळात चित्रपटसृष्टी, टीव्ही, संगीत आणि इतर क्षेत्रांतील अनुभवी व्यक्तींना संधी देण्यात आली आहे. या नव्या यादीत अभिनेत्री प्रीती झिंटा, अभिनेता पंकज त्रिपाठी आणि सुनील शेट्टी यांच्यासह एकूण 18 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.

नव्या मंडळातील सदस्यांची यादी

नव्या मंडळातील सदस्यांच्या यादीत प्रीती झिंटा, सुनील शेट्टी, रुपाली गांगुली, पल्लवी जोशी, पंकज त्रिपाठी, प्रसेनजित चॅटर्जी, मनोज जोशी, विनोद अनुपम, अभिषेक जैन, रिकी केज, प्रियदर्शन, हंसराज हंस, सुप्रिया यारलागड्डा, यतींद्र मिश्रा, नीला पांडा, रमेश पतंगे आणि वामन केंद्रे यांचा समावेश आहे. या नियुक्त्यांमुळे हिंदी चित्रपटांसोबतच प्रादेशिक मनोरंजन क्षेत्रातील प्रतिनिधित्वही नव्या मंडळात दिसून येत आहे. (Censor Board)

CBFC ची यापूर्वी ऑगस्ट 2017 मध्ये 3 वर्षांच्या कालावधीसाठी पुनर्रचना करण्यात आली होती. त्यानंतर मंडळाची नव्याने पुनर्रचना झालेली नव्हती. त्यामुळे 2020 नंतरही जुन्या मंडळातील सदस्य काम करत होते. नियमांनुसार, नवीन मंडळाची नियुक्ती होईपर्यंत विद्यमान सदस्य पदावर राहू शकतात.

मागील मंडळात अभिनेत्री विद्या बालन, चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, वामन केंद्रे, रमेश पतंगे, मिहिर भुतिया, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी टिकू, जीविता राजशेखर, टी. एस. नागभरण आणि नरेश चंद्र लाल यांच्यासह इतर सदस्यांचा समावेश होता.

दरम्यान, रुपाली गांगुली 2024 मध्ये भाजपमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्या ‘अनुपमा’ या मालिकेमुळे लोकप्रिय आहेत. पल्लवी जोशी या चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या पत्नी असून त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >